शहापूर – जन्मतः असलेला डाऊन सिंड्रोम, कमी दृष्टी आणि बारावी परीक्षेच्या अवघ्या काही दिवस आधी झालेली गंभीर दुखापत अशा तिहेरी अडचणींवर मात करत शहापूरमधील सलोनी काबाडी हिने बारावी (कॉमर्स) परीक्षेत ७१ टक्के गुण मिळवत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या यशामागे अथक परिश्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा यांची सांगड दिसून येते.

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२५ – २६ चा बारावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात शहापूरचा ८८.६२ टक्के निकाल लागला. यंदा शहापूर येथील सलोनी काबाडी हीने देखील बारावीची परिक्षा दिली होती. हार-तुऱ्यांचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे अरुण व अक्षदा काबाडी या कष्टकरी दाम्पत्याची सलोनी ही कन्या आहे. लहानपणापासूनच डाऊन सिंड्रोममुळे तिच्यासमोर अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हाने उभी राहिली. त्यातच दृष्टी कमी असल्याने अभ्यास करणे अधिकच कठीण ठरत होते. मात्र या मर्यादा स्वीकारत न बसता सलोनीने शिक्षणाचा ध्यास घेत सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.

बारावी परीक्षेच्या अवघ्या दहा दिवस आधी घरात तोल जाऊन पडल्याने तिच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली. या घटनेने कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले. परीक्षेला बसणेही अवघड होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही सलोनी खचली नाही. डॉ. शेलवले यांच्या उपचाराखाली राहून तिने धाडसाने व्हीलचेअरवरून परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाने तिच्या जिद्दीची प्रचिती आली.

शहापूरमधील खाडे विद्यालयातून १७ क्रमांकाच्या फॉर्मद्वारे तिने परीक्षा दिली. कमी दृष्टीमुळे पारंपरिक पद्धतीने वाचन-लेखन करणे कठीण असल्याने तिने अभ्यासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली. यूट्यूबवरील शैक्षणिक व्हिडिओ ऐकणे, ऑनलाईन ऑडिओ मार्गदर्शनाचा वापर करणे, धडे ऐकून समजून घेणे अशा पर्यायी पद्धतींनी तिने अभ्यास सुरू ठेवला. या प्रक्रियेत शिक्षकांनी विशेष लक्ष देत तिला आवश्यक मार्गदर्शन केले. तिच्या यशात ‘रायटर’ म्हणून अकरावीतील विद्यार्थिनी श्रेया दलाल हिने दिलेली साथही अत्यंत महत्त्वाची ठरली.

परीक्षेदरम्यान सलोनीने सांगितलेल्या उत्तरांचे अचूक लेखन करत श्रेयाने तिचा आत्मविश्वास अधिक बळकट केला. कुटुंबीयांनीही प्रत्येक टप्प्यावर तिला मानसिक आणि भावनिक आधार दिला. सलोनीची ही यशोगाथा केवळ ७१ टक्के गुणांपुरती मर्यादित नसून ती संघर्ष, धैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोनाची जिवंत उदाहरण आहे.

दहावीनंतरही आलेल्या नव्या अडचणींना तिने न डगमगता सामोरे जात पुन्हा एकदा स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे. भविष्यात बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा किंवा बीसीए (Bachelor of Computer Application) हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा तिचा मानस आहे.