सलाम शूरवीरांना – भाग १ : मरता मरता मारिले..

भारतीय सैन्याप्रमाणे पोलीस दलातील व्यक्तींनाही त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी ‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ देऊन गौरविले जाते.

thlogo01भारतीय सैन्याप्रमाणे पोलीस दलातील व्यक्तींनाही त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी ‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ देऊन गौरविले जाते. महाराष्ट्र पोलीस दलातील १२ पोलिसांना २४ फेब्रुवारी २०१५ रोजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ‘पोलीस शौर्यपदक’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यातील तीन शौर्यवीरांना मरणोत्तर शौर्यपदक देण्यात येणार आहे. प्राणांची बाजी लावून नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या या शूरवीरांना सलाम..
१९९८ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेल्या चिन्ना वेंटाने गडचिरोलीमध्ये १६ वेळा नक्षलवाद्यांशी मुकाबला केला. तत्कालीन पोलीस अधीक्षकांना नक्षलवाद्यांनी घेरले असताना धाडसी चिन्ना वेंटाने तो वेढा फोडून त्यांचे प्राण वाचवले. गट्टा येथे लग्न सोहळ्यात दोन पोलिसांना नक्षलवाद्यांनी ठार केले. त्यांचे मृतदेह नक्षलवाद्यांच्या हातून अवघ्या दोन तासांत सोडवून आणले. एटापल्ली तालुक्यात एका राजकीय कार्यकर्त्यांसह १२ नागरिकांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. चिन्नाने त्यांचीही सुटका केली.
एटापल्ली ते गट्टा मार्गावरील बांडे नदीवरील पुलाचे काम करणाऱ्या सरकारी अभियंता गणेशन यांची नक्षलवाद्यांनी निर्घृण हत्या केली. पुलाचे काम करण्यासाठी कामगार तयार नव्हते. चिन्नाने लोकांना विकासाचे महत्त्व पटवून दिले. तब्बल दोन महिने बांधकामाच्या ठिकाणी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तळ ठोकला आणि हे काम पूर्ण केले. कोको नारोटे यांनीही १९९८ मध्ये पोलीस दलात प्रवेश केला. त्यांनी १८ नक्षलवाद्यांचा यशस्वीरीत्या खात्मा केला. २२ नक्षलवाद्यांना अटक केली. मोठय़ा प्रमाणात दारूगोळा आणि हत्यारे जप्त केली. चंद्रय्या गोदारी हेदेखील सी-६०चे दल कमांडर आहेत. त्यांनी १२ नक्षलवाद्यांचे एन्काऊंटर केले, तर ६ नक्षलवाद्यांना अटक केली.
चिन्ना वेंटा, कोका नारोटे आणि चंद्रय्या गोदारी हे सी-६० दल कमांडर त्यांच्या दलासह जामिया गट्टा येथे १९ मे २०११ रोजी सकाळी सातच्या सुमारास नक्षलविरोधी अभियानामध्ये पेट्रोिलग आणि रोड ओपिनग करत होते. या वेळी नक्षलवाद्यांनी तुफान गोळीबार सुरू केला. गोळीबारात शंकर कोवासे आणि साधु पल्लो हे दोन पोलीस जवान जखमी झाले. नक्षलवाद्यांचा गोळीबार होत असतानादेखील चिन्ना निधडय़ा छातीने दोन जवानांचे प्राण वाचविण्याकरिता पुढे आले. जखमी जवानांपासून नक्षलवाद्यांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याकरिता त्यांनी आपल्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यामुळे नक्षलवाद्यांनी जखमी जवानांना सोडून गोळीबाराच्या फैरी चिन्नाच्या दिशेने सुरू केल्या. यापकी एक गोळी चिन्नाच्या जिव्हारी लागली. पण तरीही त्यांनी गोळीबार सुरू ठेवला व दोन नक्षलवादी टिपले. जखमी सहकाऱ्यांना ते सतत ‘‘घाबरू नका. मी ठीक आहे. ही आपली लढाईची वेळ आहे. प्राणपणाने लढा.’’ असे सांगत होते. कोका नरोटे आणि त्यांच्या सी-६० दलाने पुढे येऊन चिन्ना आणि इतर पोलिसांना कव्हर केले. कोका नरोटेने नक्षलवाद्यांचे लपलेले ठिकाण शोधून त्यांचा अ‍ॅम्बुश उद्ध्वस्त केला. दुसऱ्या बाजूने चंद्रय्या गोदारीदेखील सी-६० दलासह येऊन सर्व नक्षलवाद्यांवर हल्ला करून त्यांना पळवून लावले. साक्षात मृत्यू समोर दिसत असतानादेखील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कोका नरोटे आणि चंद्रय्या गोदारी यांना शौर्य पदकाने गौरविण्यात आले. स्वत: पुढे होऊन दोन पोलिसांचे प्राण वाचविणाऱ्या आणि त्याही परिस्थितीत दोन नक्षलवाद्यांना यमसदनी धाडणाऱ्या चिन्ना वेंटा यांच्या असामान्य कर्तृत्वाचा सन्मान (मरणोत्तर) शौर्य पदकाने करण्यात आला.
डॉ. रश्मी करंदीकर -पोलीस उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salute to martyrs part one