ठाणे : नाटय़ आणि साहित्य संमेलन अध्यक्ष पदासाठी साहित्यिकांमध्ये निवडणुक कसली घेताय. आमच्या निवडणुक होतात, तेच बस्स झाले. निवडणुकीविनाच अध्यक्षपदाची निवड व्हावी असे मत उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी ठाण्यातील युवा साहित्य संमलनात बोलताना केले.

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये मंगळवारी कोकण मराठी साहित्य परिषद आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे युवा साहित्य संमलेन भरविण्यात आले होते. त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकर, कोमसपाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, संमेलनाचे अध्यक्ष प्रणव सखदेव, स्वागत अध्यक्ष नरेश म्हस्के हे उपस्थित होते. संमेलन अध्यक्ष पदाच्या निवडीची चर्चा तीन महिने आधीपासूनच सुरु होते. कोण अध्यक्ष होणार, त्याचा कार्यकाळ किती असेल, त्यांनी किती पुस्तके लिहिली हे आम्ही वाचतो. परंतु युवा साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष पदाची निवड बिनविरोध करण्यात आली, हे चांगले लक्षण आहे. हाच पायंडा सर्वच संमेलनांनी पाडला पाहिजे, असे मतही  व्यक्त केले.

वाचन संस्कृती टिकते की नाही, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. दिंडीत मुले सहभागी होतात. त्यानंतर पुढे काय होते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत साहित्य कसे पोहचले, याचा विचार होणे गरजेचे आहे असे सामंत म्हणाले.