मराठी रंगभूमीच्या वाटचालीत अनेक चढउतार आले, स्थित्यंतरे झाली. पण, जोपर्यंत भाषा, विचार आणि वैचारिक खोली शब्द रचनेत आहेत, तोपर्यंत मराठी नाटकांना कोणतेही मरण नाही. जो उत्तम आहे तो विचार, सूर, विषय असेल, तो नेहमीच स्वीकारला जातो. म्हणुनच भरतमुनींपासून ते लेखक शेखर ढवळीकर, आनंद म्हसवेकर यांच्या पर्यंतचा लेखन प्रवास आपण नाट्य कलाकृतींमधून अनुभवत आहोत, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री आणि डोंबिवलीतील मराठी युवा नाट्य साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>ठाणे: खारेगाव भागातील नाल्यात आढळला मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि डोंबिवली शाखेतर्फे डोंबिवलीत माऊली सभागृहात रविवारी तरुणांच्या कलाकृतींना वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने मराठी युवा नाट्य संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी साहित्य परिषद डोंबिवली शाखेचे अध्यक्ष वामनराव देशपांडे, साहित्य पुणे शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विकास पिंगळे, सुनीता राजे-पवार, माधव राजगुरू, डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, दीपाली काळे, उमा आवटेपुजारी उपस्थित होते.

हेही वाचा >>>‘गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा’; ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मराठी नाटक हा भाषा पुढे नेणारा महत्वाचा घटक आहे. भाषा, हालचालींमधून नाटक घडते. हाच विचार भरतमुनींपासून नाट्य माध्यमातून आतापर्यंत देण्यात येत आहे. अमुक लेखकाच्या नादी लागतोस म्हणून फुकट जाशील म्हणून ज्यांची संभावना कुटुंबीयांनी केली. तेच पुढे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते झाले. आताच्या बदलत्या परिस्थितीत मुलांना डाॅक्टर, इंजिनिअर, वकील व्हावे असे पालकांना वाटत असेल तर कलाक्षेत्र ही तुम्हाला चांगली स्थिती देणारे क्षेत्र आहे. याचाही पालकांनी विचार करावा. मुलांना कष्टाची जाणीव करुन देत, त्यांना त्यांच्या बुध्दिमता, आवडीने पुढे जीवनमान घडविणारे होऊन द्यावे, असे संमेलनाध्यक्षा जोगळेकर यांनी सांगितले.

आजच्या युवा संमेलनात युवक किती हा प्रश्न असला तरी, युवकांमध्ये आता बदल्या तंत्रशैलीमुळे उपजत अंगभूत कौशल्ये प्राप्त झाली आहेत. त्यांना थोडे मार्गदर्शन आणि दिशा दिली तर नक्कीच त्यांचा दिशादर्शक प्रवाह तयार होतो. नव माध्यमांमुळे तीन अंक नाटक आता दोन अंकावर आले आहे. मोठे पडदे जाऊन छोटे पडदे येतात की काय अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीत अनेक नवतरुण मंडळी दर्जेदार लिखाण करुन एक उत्तम विचार समाजाला देत आहेत. मुग्धा गोडबोले त्याचे चांगले उदाहरण आहे. या तरुण कलावंत मंडळींना घेऊन आपण जुन्या-नव्याची सांगड घालत संगीत मत्स्यगंधा नाटक वाचविले. अशाच पध्दतीने किनाऱ्यावरील दीर्घ विचारी एक एक नाटकांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, असे जोगळेकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>‘राज्य महिला आयोगाने रामदेव बाबांवर कारवाई करावी’; ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांची मागणी

एकांकिका स्पर्धांमधून दिसणारी युवा कलाकारांची सळसळ व्यावसायिक नाटकाच्या वेळी गुडूप का होते. हा नेहमीच सतावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर दीर्घकाळ लिखाण आणि वैचारिक खोलीत आहे. आपल्या लेखन, नाट्य प्रवासाच्या आरंभीच्या काळात जागोजागी नकार दिसले. त्यामधून शिकायला मिळाले. तीन भिंतींच्या बंद खोलीत नाटक आणि प्रेक्षकांच्या पाठबळाने, मान्यतेने लेखनातून वेगळा दृष्टीकोन पुढचा यशस्वी प्रवास केला, असे जोगळेकर यांनी सांगितले. प्रास्ताविक सुरेश देशपांडे, सूत्रसंचालन उमा आवटेपुजारी यांनी केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sampada joglekar president of the youth drama conference in dombivli expressed her opinion about plays amy
First published on: 27-11-2022 at 18:41 IST