Samruddhi Mahamarg Crime News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे विविध शहरे जोडली गेली असतानाच, आता समृद्धी महामार्गावर लुटारूंच्या टोळ्या घात घालून बसत असल्याचे उघडकीस आले आहे. नाशिकमधील एका वाहन चालकाला शहापूर येथील खुटघर टोलनाक्याजवळ लुबाडणूक करुन त्याला बेदम मारहाण झाली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यातील तक्रारदार हे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक असून त्यांच्याकडे चालक म्हणून जितेंद्रकुमार यादव हे काम करतात. जितेंद्रकुमार याने नागपूर येथून औद्योगिक कंपन्यांमधील कोळशाची राख घेऊन भिवंडी येथील पडघ्याच्या दिशेने वाहतुक करत होता. २ मार्चला मध्यरात्री तो वाहतुक करत असताना महामार्गावरील शहापूर येथील खुटघर येथे पोहचला. त्याचवेळी त्याच्या धावत्या ट्रकमध्ये ८ ते १० जणांनी प्रवेश केला. त्यांनी जितेंद्रकुमारला बेदम मारहाण करत ट्रकची किल्ली घेऊन ट्रक थांबिवला. त्यांना ट्रकमधून खाली उतरविल्यानंतर लोखंडी सळईने मारहाण करण्यास सुरुवात केली.
टोळक्यातील एकाकडे चाकू देखील होता. त्यांनी चाकूचा धाक दाखवून जितेंद्रकुमार याच्या खिशातील १२ हजार रुपये, ट्रकमधील १५० लीटर डिझेल इंधन टोळीने त्यांच्याकडील ट्रकमध्ये काढून घेतले. त्यानंतर हल्लेखोर तेथून निघून गेले. जितेंद्रकुमार याने याबाबतची माहिती त्याच्या मालकाला दिली. जितेंद्रकुमार याला उपचारासाठी शहापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला मुंबईत उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचारानंतर तो अमरावती येथे निघून आला. या घटनेप्रकरणी ट्रक व्यवसायिकाने तक्रार दाखल केल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
