ठाणे : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील सेवा रस्त्यावर झालेल्या अपघातात १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी त्याच्या मित्रा विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहापूर येथील गोठेघर भागात १६ वर्षीय मुलगा त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या वडिलांचे वाहन दुरुस्तीचे दुकान आहे. गुरुवारी सकाळीदुरुस्तीसाठी आणलेली कार घेऊन तो त्याच्या एका मित्रासोबत गेला होता. समृद्धी महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत कासगाव येथे पोहचले असता, त्यांच्या कारची धडक दुभाजकाला बसली. या अपघाता दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात झाला त्यावेळी १६ वर्षीय मुलाचा मित्र वाहन चालवित होता.
घटनेची माहिती शहापूर पोलिसांनी कार मालकाला दिली. त्यानंतर कार मालकाने तात्काळ मुलाच्या वडिलांना संपर्क साधून अपघात झाल्याचे सांगितले. अपघातातील जखमी दोघांनाही अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यातील १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.या अपघाता प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात मृत मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार, १६ वर्षीय मुलाच्या मित्रा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
