डोंबिवली – डोंबिवली जवळील मोठागाव रेतीबंदर, कुंभारखाण पाडा भागात उल्हास खाडीला उधाण आले आहे. अशा परिस्थितीत खाडी पात्रात वाळूचा बेकायदा उपसा करणारी वाळू माफियांची ३० लाख रूपयांची यांत्रिक सामग्री महसूल डोंबिवली, कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी खाडी पात्रात बुडून टाकली. काही सामग्रीला आग लावून ती भस्मसात केली.
मागील वर्षभर कल्याण, डोंबिवली महसूल विभागाची कोपर, रेतीबंदर, मोठागाव, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा भागात वाळू माफियांच्या विरुध्द जोरदार कारवाई सुरू आहे. या कारवाईत माफियांची लाखो रूपयांची सामग्री यापूर्वीही नष्ट करण्यात आली आहे. तरीही नवीन सामग्री तयार करून पुन्हा खाडी पात्रात बेकायदा वाळू माफिया उपसा करण्यासाठी सक्रिय होतात.
गुरूवारी दुपारी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या सूचनेवरून महसूल डोंबिवली, कल्याणचे मंडळ अधिकारी दीपक गायकवाड, डोंबिवलीचे मंडळ अधिकारी रवींद्र जमदरे, ग्राम महसूल अधिकारी अरूण कासार, कौस्तुभ मुणगेकर, प्रशांत चौगुले यांचे पथक डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा ते रेतीबंदर मोठागाव, कोपर पट्ट्यात बोटीच्या साहाय्याने गस्त घालत होते. मुसळधार पावसामुळे उल्हास खाडीला भरती आहे. अशा परिस्थितीत खाडी पात्रात वाळू माफिया नसतील असा अधिकाऱ्यांना अंदाज होता. पाऊस सुरू झाल्याने अधिक प्रमाणात वाळू वाहून येते. कमी कालावधीत अधिकचा वाळू उपसा करता येतो याची माहिती असल्याने दोन बार्जेस आणि चार उपसा पंप घेऊन रेतीबंदर ते कुंभारखाणपाडा खाडीच्या मध्यभागी वाळू माफिया बेकायदा वाळू उपसा करत आहेत, असे गस्ती बोटीवरील महसूल अधिकाऱ्यांना दिसले.
महसूल अधिकाऱ्यांनी तात्काळ आपली बोट वाळू माफियांच्या उपसा बोटीकडे वळवली. महसूल अधिकारी आपल्याकडे येत आहेत हे कळताच वाळू उपसा बोटींवरील वाळू माफिया, त्यांच्या मजुरांनी खाडी पात्रात उड्या मारल्या. ते पोहत भिवंडी बाजूकडील किनाऱ्याला गेले. वाळू उपशाची खाडी पात्रातील अवजड सामग्री सहज खेचून खाडी किनारी आणणे शक्य नव्हते. त्यात खाडीच्या पाण्याचा वेगवान प्रवाह, मुसळधार पाऊस त्यामुळे या वाळू उपसा बोटींवर, उपसा पंपावर कारवाई करण्याचे आव्हान महसूल अधिकाऱ्यांसमोर होते. अखेर आहे त्या जागीच वाळू माफियांचे बार्जेस, उपसा बोटी बुडविण्याचा आणि त्यामधील यंत्रसामग्री जाळून टाकण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.
बार्जेससोबत असलेल्या उपसा पंपांना गॅस कटरने कापून हे पंप आणि त्या सोबतच्या बोटी पाण्याने भरताच खाडी पात्रात बुडविण्यात आल्या. उपसा पंप आणि बोटींवरील यंत्रसामग्रीचा पुन्हा वापर होऊ नये म्हणून ती यंत्रणा साखर, मीठाचा भडीमार करून पेटवून आगीत भस्मसात करण्यात आली. चौदा लाखाचे दोन बार्जेस, सोळा लाखाचे चार उपसा पंप अशी एकूण ३० लाखाची वाळू माफियांची सामग्री महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी खाडीत बुडवली.
पाऊस सुरू असला तरी खाडी पात्रात वाळूचा बेकायदा उपसा करणाऱ्यांविरुध्दची मोहीम सुरूच राहणार आहे. वर्षभरात वाळू उपसा करणाऱ्यांची लाखो रूपयांची सामग्री खाडी पात्रात बुडवली. काही जाळून नष्ट केली. – सचिन शेजाळ, तहसीलदार