ठाणे – संस्कार भारती कोकण प्रांत ठाणे महानगर आणि श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त पाच कलाकारांचा ‘कला गुण गौरव सोहळा’ आणि ‘वंदे नटराज राजम्’ हा विशेष कार्यक्रम जोशी – बेडेकर महाविद्यालयातील पाणिनी सभागृहात उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात तीन घराण्यांच्या गायकीवर प्रभुत्व असलेले पंडित अरुण कशाळकर, अभिनेते व निर्माते अरुण नलावडे, नाट्यसंगीत गायन-अभिनयासह खगोलशास्त्राचे अभ्यासक पंडित मुकुंद मराठे, उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे पट्टशिष्य शहनाई वादक पंडित शैलेश भागवत आणि अष्टपैलू नाट्य व चित्रपट कलाकार प्रमोद पवार यांचा संसदरत्न खासदार नरेश म्हस्के आणि महामहोपाध्याय पदवीने सन्मानित डॉ. मंजिरी देव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महामहोपाध्याय पदवी मिळाल्याबद्दल डॉ. मंजिरी देव यांचाही खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्कार भारती ठाणेच्या अध्यक्षा डॉ. कीर्ती आगाशे, श्री कौपिनेश्वर न्यास ठाणेचे अध्यक्ष उत्तम जोशी, न्यासाचे कार्याध्यक्ष आणि संस्कार भारतीचे प्रांत उपाध्यक्ष संजीव ब्रह्मे आदी उपस्थित होते.
‘वंदे नटराज राजम्’ या कार्यक्रमात नृत्यांगना फाल्गुनी नातू, मयुरी राजवाडे, डॉ. स्वप्ना जोशी आणि संस्कार भारतीच्या मंचीय कला संयोजक अपर्णा बेडेकर यांनी नटराज या सर्व कलांचे अधिष्ठान असलेल्या देवतेवर आधारित भरतनाट्यम आणि कथक शैलीतील नृत्याविष्कार सादर केला. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून दाद मिळाली.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आयोजित चारोळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभही यावेळी झाला. सुप्रसिद्ध कवी प्रा. अशोक बागवे आणि वर्षा तळवेलकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अजित पावसकर आणि राजेंद्र रेडकर यांनी चित्रकला स्पर्धेचे परीक्षण केले.
