ठाणे : ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते तथा शिंदे गटाच्या नेत्यांवर सदैव आपल्या शैलीतून आगपाखड करणारे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या पुत्राच्या विवाहसोहळ्यास उपस्थिती लावली. संजय राऊत यांच्या अचानक एन्ट्रीने ठाण्यातील शिंदे गटाचे पदाधिकारी देखील अवाक झाले.

खासदार संजय राऊत हे महायुती सरकार आणि विशेषत: शिंदे गटावर नेहमी टीका करत असतात. यास प्रतिक्रिया म्हणून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के हे देखील त्यांच्यावर टीका करतात. अनेकदा हे टीकेनंतर माध्यमांवर चर्चा रंगू लागते. टीका-टिपण्णीनंतर वाद शांत होतात. परंतु कार्यकर्त्यांमध्ये मात्र राजकीय मतभेद निर्माण होतात.

सार्वजनिक ठिकाणी किंवा राजकीय मिरवणूकीत विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी नेते एकमेकांशी संवाद साधणे देखील टाळतात. गुरुवारी मात्र एका खासगी समारंभात वेगळेच चित्र अनुभवता आले. खासदार संजय राऊत आणि खासदार नरेश म्हस्के एकमेकांसमोर आले. ते विरोधासाठी नाही तर नरेश म्हस्के यांच्या पुत्राच्या विवाहसोहळ्यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या पुत्राचा आशुतोष याचा गुरुवारी विवाह सोहळा होता. या सोहळ्यास अनेकांना निमंत्रण देण्यात आली होती. हा सोहळा ठाण्यातील एका रिसाॅर्टवर होता.

गुरुवारी खासदार संजय राऊत हे अचानक या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिले. त्यांच्या स्वागतासाठी चक्क शिंदे गटाचे पदाधिकारी होते. संजय राऊत यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर नरेश म्हस्के यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. राऊत यांच्या उपस्थितीमुळे शिंदे गटाचे पदाधिकारी देखील अवाक झाले होते. विरोध हा केवळ राजकीय असतो किंवा विचारधारेशी असतो, यातून हे स्पष्ट होते. यापूर्वी देखील अनेकदा युती आणि आघाडीचे नेते एखाद्या खासगी कार्यक्रमास किंवा लग्नसमारंभास दिसले होते.