ठाणे – ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी संबंधित खासदारांवर आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “तुमची रिक्षात फिरायची औकात नव्हती, आज खासगी विमानातून फिरता. ही किंमत तुम्हाला ठाकरे नावामुळे मिळाली आहे,” अशा शब्दांत राऊत यांनी निशाणा साधला.

नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान उतरल्याची आणि त्यातून काही खासदारांना मुंबईबाहेर नेण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच राऊत यांनी सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान उतरते. ‘ऑपरेशन टायगर’च्या नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जाते. ज्यांची रिक्षात फिरायचीही औकात नव्हती, त्यांची किंमत ठाकरे नावामुळे वाढली. आज ते खासगी विमानातून फिरत आहेत. प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल,” असे राऊत यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ या शब्दप्रयोगावरही टीका केली. “डरपोक कोल्ह्यांच्या पळवापळवीला वाघाचे ऑपरेशन कसे म्हणता?” असा सवाल करत त्यांनी पक्षांतराच्या चर्चांवर निशाणा साधला.

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत झालेल्या फूटीनंतर दोन्ही गटांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

दरम्यान, ठाकरे गटाकडून पक्ष फोडण्यासाठी दबाव, आमिषे आणि राजकीय यंत्रणेचा वापर होत असल्याचे आरोप वारंवार केले जात आहेत. तर शिंदे गटाकडून हे आरोप फेटाळून लावत अनेक लोकप्रतिनिधी विकासाच्या राजकारणासाठी स्वेच्छेने पक्षात येत असल्याचा दावा केला जात आहे.

राऊत यांच्या या वक्तव्यानंतर संबंधित खासदारांकडून किंवा शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.