ठाणे : खासदार संजय राऊत हे ठाकरे गटाचे फायर ब्रँड म्हणून ओळखले जातात. राज्यसभेत ते सत्ताधारी भाजप आणि महायुतीच्या पक्षांतील नेत्यांवर ते नियमितपणे टीका करत असतात. आता राज्यसभेच्या निवडणूकीत शिंदे गटाने डॉ. ज्योती वाघमारे यांची उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे राज्यसभेत संजय राऊत विरुद्ध डाॅ. ज्योती वाघमारे यांच्यामध्ये समना रंगण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या सात जागांसाठी सात अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आङे. शिवसेना शिंदे गटाने पक्षाच्या प्रवक्त्या डाॅ. ज्योती वाघमारे यांची उमेदवारी जाहीर करुन आश्चर्याचा धक्का दिला. शिंदे यांच्या या धक्कातंत्रामुळे माजी खासदार राहुल शेवाळे, पक्षाच्या प्रवक्त्या शायना एन.सी., माजी खासदार आनंदराव अडसुळ यांच्यासह अनेकांचा हिरमोड झाला. राज्यसभेवर पक्ष त्यांचा अभ्यासू नेता पाठवित असते. त्याप्रमाणे शिंदे गटाने डाॅ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठविले.
कोण आहेत ज्योती वाघमारे
डाॅ. ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूरच्या असून त्यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहे. त्यांनी वालचंद महाविद्यालयात १० वर्ष प्राध्यापिका म्हणून काम केले. डॉ. वाघमारे यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून तसेच काहीकाळ बांधकाम मजूर म्हणून काम केले. पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या, शाळेत अनवाणी जाऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्योती यांनी दहावी तसेच बारावीत परीक्षेत चांगले गुण मिळवले. उच्चशिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने डॉ. वाघमारे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्याने दिली आहेत.
उमेदवारीनंतर काय म्हणाल्या..
राजकारण करण्यासाठी बाप मोठा असावा लागतो, नाव मोठे लागते, आडनाव मोठे लागते, मी मोठ्या बापाची मुलगी नाही पण पक्षासाठी केलेली प्रामाणिक धडपड आणि काम यापुढे तुम्ही गरिब जरी असलात तरी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष असते आणि ते न्याय देतात याचं उदाहरण आज समोर आहे असे वाघमारे म्हणाल्या. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज माझ्यासारख्या गरिब कुटुंबातील मुलीला, डॉ. भीमरावांच्या मुलीला दिलेला हा न्याय आहे. त्या म्हणाल्या की, माझी उमेदवारी ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची, सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची आणि संविधानाने आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे, असे सांगत त्यांनी महापुरुषांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या आई वडिलांना राज्यसभा काय हे माहित नाही आणि त्यांना सांगून देखील खरं वाटणार नाही. जातीपातीच्या भिंती मोडून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली, असे डॉ. वाघमारे म्हणाल्या.
राऊत विरुद्ध वाघमारे
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक भाषणासाठी, मुद्दे मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यसभेत भाषण करताना ते विरोधकांवर भाषणाद्वारे अक्षरश: तुटून पडतात. राज्यसभेत त्यांच्या भाषणाची चर्चा होत असते. आता वाघमारे या शिंदे गटाच्या उमेदवार असल्याने त्या निवडून गेल्यानंतर राऊत विरुद्ध वाघमारे असा संघर्ष निर्माण होऊ शकतो.
