‘नाही रे’ वर्गातील मुलांसाठी सुसंस्कारांची तुळस

लीकडच्या काही दशकांत प्रामुख्याने शहरी संस्कृतीत जेथे एकत्र कुटुंब पद्धती जवळपास संपुष्टात आली आहे.

आयुष्याला आकार देण्यात संस्कारांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. अलीकडच्या काही दशकांत प्रामुख्याने शहरी संस्कृतीत जेथे एकत्र कुटुंब पद्धती जवळपास संपुष्टात आली आहे आणि नवरा-बायको दोघेही नोकरी करतात, अशा घरांमध्ये संस्कृती व संस्कारांची परंपरा जवळपास संपुष्टात आली आहे. त्यातही अठराविशे दारिद्रय़ असलेल्या घरांमध्ये जिथे दोन वेळची अन्नाची मारामारी आहे तेथे संस्कार व संस्कृतीचा विचारही होऊ शकत नाही. नेमकी हीच उणीव लक्षात घेऊन रोहिणी बापट, सुनंदा अमरावतकर, वैशाली पंडित आदी महिला पुढे आल्या. त्यांनी ‘भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळा’ची ठाण्यात स्थापना केली. त्याच्या माध्यमातून समाजात चांगला प्राणवायू निर्माण व्हावा यासाठी ‘तुलसी’ प्रकल्प सुरू केला. या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी बदलापूर येथे १९९३ मध्ये आश्रमाची स्थापना करण्यात आली. झोपडपट्टी तसेच गरीब वस्त्यांमधून बालवाडय़ा सुरू करण्यात आल्या. ठाणे जिल्हय़ातील जव्हार व मोखाडा येथेही मोठय़ा संख्येने बालवाडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत.

संस्थेची स्थापना करणाऱ्या महिलांचा प्रवासही चित्तवेधक आहे. रोहिणी बापट यांनी हा सारा प्रवास उलगडून दाखवला. ‘रत्नागिरीमध्ये माझ्या आजोबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर सामाजिक काम केले होते. समाजासाठी, तळागाळातील लोकांसाठी काही तरी करण्याचा वारसा घरातूनच मिळालेला होता. रत्नागिरीत पतितपावन मंदिराशेजारीच आमचे घर असल्यामुळे अनेक सामाजिक चळवळी व कामे जवळून बघता आली. विश्व हिंदू परिषदेसाठी काम करत असतानाच स्वतंत्रपणे काही तरी सामाजिक कार्य केले पाहिजे या जाणिवेतून ‘भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ’ या नोंदणीकृत संस्थेची स्थापना केली.

झोपडपट्टीमधील अनाथ मुलींना दत्तक घेऊन त्यांच्यासाठी बदलापूर येथे आश्रम सुरू केला. हाच तो तुलसी प्रकल्प.. तुळस तुमच्या परिसराला शुद्ध हवेचा पुरवठा करते. नेमकी हीच संकल्पना या प्रकल्पामागे आहे. समाजात चांगल्या शुद्ध तत्त्वांची रुजवणूक करणे आणि त्यातून समाजासाठी झटणारे लोक निर्माण करणे हा दृष्टिकोन यामागे होता. सुरुवातीला मुले-मुली एक त्र होती. पुढे मुले मोठी होऊ लागली तशी बदलापूर येथेच दुसरी जागा घेऊन मुली व मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. ‘अगदी गरीब घरातील ३२ मुली व २५ अनाथ मुले आमच्या आश्रमात आहेत. त्यातील काही बारावीपर्यंत शिकली, तर काहींचे शिक्षण सुरू आहे. या मुलांनी आपल्या पायावर उभे राहावे यासाठी संस्था सर्वतोपरी मदत करते. हे काम सुरू असतानाच ठाण्यातील वागळे इस्टेट विभागात बालवाडीचा उपक्रम सुरू केला. लहान मुले ही निरागस असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी हा उपक्रम गरीब वस्त्यांमधून सुरू केला,’ असे रोहिणीताई सांगतात. वयाच्या ७३व्या वर्षीही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. येथे सध्या २२ बालवाडय़ा सुरू असून स्थानिक परिसरातीलच महिलेला योग्य प्रशिक्षण देऊन बालवाडय़ा चालविण्याची जबाबदारी दिली जाते. यासाठी त्यांना वेतनही दिले जात असून पुढे भिवंडी, मोखाडा व जव्हार येथेही ५६ बालवाडय़ा सुरू करण्यात आल्या. या बालवाडय़ांमधून मुलांना शब्द, शब्दांचे उच्चार, प्रार्थना, गोष्टी व गाणी शिकवली जातात. पहिलीमध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी या मुलांकडून करवून घेताना भारतीय संस्कारांची शिदोरी त्यांना दिली जाते. समाजात चांगली सुसंस्कारित पिढी निर्माण व्हावी हा दृष्टिकोन यामागे असल्याचे रोहिणीताई सहज सांगून जातात.

सर्व शिक्षकांना नियमित प्रशिक्षण दिले जाते. सुधा शिधये, रोहिणी ओजाळे, सुनंदा अमरावतकर आदी बालवाडय़ांच्या उपक्रमावर देखरेख ठेवून असतात. जव्हार-मोखाडय़ातील मुलांना बालवाडीत चांगले अन्न दिले जाते. यामध्ये खिचडी, भाजी, मोड आलेले कडधान्य तसेच साजूक तूप आणि अन्न शिजविण्यासाठी कर्डईचे तेल वापरले जाते, जेणेकरून या मुलांची चांगली वाढ व्हावी. यासाठी संस्थेला खर्चही बराच येत असला तरी दानी लोकांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर काम सुरू आहे.

मोखाडा व जव्हारमधील काम पाहण्यासाठी वैशाली कुंटे, स्वाती जोशी, ज्योत्स्ना पाटील आणि दामले या ठाण्याहून नियमितपणे जात असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व निवृत्त शिक्षिका आहेत. संस्थेतील जवळपास सर्वच महिला या साठीच्या पलीकडल्या असूनही त्यांच्यातील उत्साह दांडगा आहे. येथे सुमारे पाचशे मुले असून वीस पाडय़ांमध्ये पाडे स्वयंपूर्ण, कुपोषणमुक्त तसेच व्यसनमुक्त करण्याचा उपक्रमही संस्थेने हाती घेतला आहे.  अमेरिकन नागरिक असलेल्या भगिनी निवेदिता यांनी स्वामी विवेकानंदांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर भारतात राहून गोरगरिबांची सेवा केली. अनाथांना मायेची सावली दिली. त्यामुळेच त्यांचे नाव संस्थेला देण्यात आले असून सामाजिक बांधिलकीची खरी भारतीय संस्कृती रुजविण्याचे काम ही संस्था करत आहे.

  • भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ, चैतन्य सुदर्शन कॉलनी, ठाणे पूर्व.
  • दूरध्वनी- ९८६९०२१३३२

(रोहिणी बापट)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sanskars is importance in real life

ताज्या बातम्या