ठाण्यातील उरल्यासुरल्या मोजक्याच मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अग्रगण्य असलेल्या ‘सरस्वती मंदिर ट्रस्ट’च्या विश्वस्तांनी या शाळेत सीबीएसई बोर्डाची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय तडकाफडकी घेतला. परंतु विश्वस्तांच्या या निर्णयाला शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा विरोध होऊ लागला आहे. त्यामागे काही कारणेही आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्यावर मराठी माध्यमाला दुय्यम स्थान मिळेल काय, कालांतराने मराठी शाळा बंदच होईल की काय.. असे एक ना अनेक प्रश्न या पालकांसमोर आहेत. या काळजीपोटीच या शाळेचे पालक शाळा वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत. आजूबाजूला इंग्रजीचे वातावरण असताना मातृभाषेतून शिक्षण झाले पाहिजे आणि ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजे या आग्रहाने आपल्या मुलांना मराठी माध्यमामध्ये पाठविलेल्या पालकांची शाळेने ऐन वेळी फसवणूक केली आहे, अशी भावना या पालकांच्या मनात आहे. आणि त्यांची समर्पक उत्तरे जर ट्रस्टींनी दिली नाहीत तर पालकांच्या या आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
विमलाताई कर्वे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट स्थापन करून मराठी माध्यमाची शाळा सुरू केली. या शाळेला मोठा इतिहास असून शिक्षणाचा उत्तम दर्जा आणि गुणवत्ता या जोरावर शाळेने नावलौकिक मिळवला आहे. आजही या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आवर्जून प्रयत्न करणारे पालक ठाणे परिसरात आहेत. ठाण्यात इंग्रजी माध्यमाच्या गल्लीबोळात शाळा झाल्या असल्या तरी नौपाडय़ातील या शाळेने आपला लौकिक कायम राखला आहे. मात्र संस्थापक असणाऱ्या विमलाताई कर्वे यांचे गतवर्षी निधन झाले आणि १०० टक्के अनुदान असणाऱ्या या शाळेच्या विश्वस्तांनी सीबीएसई इंग्रजी माध्यमाची शाळा करण्याचा घाट घातला आहे, अशी चर्चा आहे.
गुणात्मक शिक्षण देणाऱ्या या शाळेच्या आवारात इंग्रजी बोल बोलले जाणार याला पालकांचा विरोध नाही. मात्र त्यासोबत मराठी शाळेचा गळा घोटला जाणार आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे मनोबल खचणार या भीतीने पालक ग्रासले आहेत. शाळेच्या विश्वस्तांनी हा निर्णय एकाकी जाहीर केला किंवा माजी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार केला, तो त्यांचा अधिकारही असेल आणि नियमाप्रमाणे सगळे बरोबरही असेल; परंतु असा निर्णय घेताना सध्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही याबाबत कल्पना देणे आवश्यक होते. शाळेच्या प्रत्येक सत्रात पालकांची मीटिंग होत असते, या मीटिंगला शाळेच्या नवीन इमारतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येते, परंतु विश्वस्त सीबीएसई माध्यमाची शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहेत याची पुसटशी कल्पनाही दिली गेली नाही. त्यामुळेच प्रश्न पालकांच्या भीतीचा, भावनेचा आणि विश्वासाचा आहे.
मराठी माध्यमातून उत्तम शिक्षण देणारी शाळा म्हणून पालकांनी आपली मुले या शाळेत पाठविली. शाळेची इमारत बांधताना सढळ हस्ते मदत केली. शाळेच्या प्रत्येक उपक्रमात पालकांचा सहभाग असतो. गेल्या अनेक वर्षांपासून आजी-माजी विद्यार्थी आणि पालकांचे असे ‘सरस्वती’चे कुटुंब झाले असताना क्रीडा संकुलात इंग्रजी शाळा सुरू करण्याचा निर्णय विश्वस्तांनी परस्पर पालकांच्या कानी खबर न जाता का जाहीर केला? म्हणूनच बहुदा पालकांच्या मनात अनेक प्रश्नांची पाल चुकचुकते आहे. जसे आपले मूल स्मार्ट व्हायचे असेल तर इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही, अशी अनेक पालकांची मानसिकता असल्याचे मत पालकांप्रमाणेच विश्वस्तांना वाटत असेलही कदाचित परंतु एकाच प्रांगणात मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी कसे काय वावरणार, हा प्रश्न उरतोच.
असाच प्रयत्न पाल्र्यातील पार्ले टिळक विद्यालयात झाला, त्यात मराठी माध्यमातील मुलांच्या बाबत होणारी हेळसांड अनेक पालकांना ज्ञात असून तीच परिस्थिती ठाण्यात कशावरून होणार नाही, इंग्रजी माध्यमातील मुलांचे राहणीमान, त्यांच्या सोयीसुविधा, भाषा, संस्कृती यामुळे मराठी माध्यमाच्या मुलांनी जर पालकांना दोष दिला तर त्याला जबाबदार कोण? जर शाळेचे विश्वस्त एवढा मोठा निर्णय घेणार होते तर शिक्षक, पालक आणि या शाळेशी भावनिकदृष्टय़ा जोडले गेलेले माजी विद्यार्थी यांची एकत्रित बैठक घेऊन याबाबत विश्वस्तांनी विचार-विनिमय का केला नाही? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून ट्रस्टींच्या निर्णयाविरोधात पालक एकवटले आहेत.
वास्तविक पाहता या शाळेची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता उंचावर असताना व्यापारीकरणाला बळ देताना इंग्रजी शाळेचे वेध का लागावेत, असाही प्रश्न पालकांना सतावतो आहे. या शाळेतून मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन आज नावारूपाला आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची मुले येथे शिकत आहेत, त्यामुळे स्वाभाविकत: एका भावनेने ते शाळेशी जोडले गेलेले आहेत. आपल्या मुलाला उत्तम इंग्रजी आले पाहिजे ही काळाची गरज आहे, हा आग्रह सर्वाचा आहे. मात्र या शाळेत जेव्हा मूल पाठवले जाते तेव्हा अस्सल मराठी संस्कार त्याच्यावर होईल ही भावना पालकांमध्ये असते आणि त्यामुळे या संस्कारालाच या नव्या शाळेच्या संकल्पनेने तडा जाईल या भीतीने पालकांना ग्रासले आहे आणि म्हणून हे आंदोलन उभे राहते आहे. याला विश्वस्त जर वेळीच सामोरे गेले नाहीत तर हा संघर्ष येणाऱ्या काळात पेटण्याची चिन्हे आहेत. ठाण्यात अन्य ठिकाणी त्याच नावाने कुठल्याही बोर्डाची शाळा सुरू व्हावी. मात्र त्याच आवारत माध्यमांची सरमिसळ विश्वस्तांनी करू नये एवढीच पालकांची अपेक्षा आहे.
