ठाणे – महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत परंपरेची जोपासना विविध स्पर्धा आयोजित करून केली जाते. या दुर्गबांधणी स्पर्धेत प्रामुख्याने शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा समावेश असतो. दरम्यान भारतीय पुरातन शास्त्र संस्थेच्या पुणे विभाग आणि येसाजी कंक प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय पातळीवरील दुर्ग प्रतिकृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सरस्वती शाळेचे छात्र सेनेचे विद्यार्थी सहभागी झाले असून त्यांनी राजगडाची प्रतिकृती उभारली आहे.

दिवाळी सणात किल्ले बांधणी करणे हे समीकरण पूर्वीपासून चालत आले आहे. विविध गावांमध्ये अजूनही दिवाळीच्या आधी किल्ले साकारण्याची, ते सजवण्याची परंपरा कायम आहे. हीच परंपरा शहरी भागातही जोपासली जावी यासाठी या काळात विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. या दूर्ग बांधणी स्पर्धेत पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने दगड माती, शाडू माती, विटा, लाकूड, कागद, शेण अशा विविध प्रकारच्या साहित्याचा वापर करत किल्ले साकारले जातात.

भारतीय पुरातन शास्त्र संस्थेच्या पुणे विभाग आणि येसाजी कंक प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील दुर्ग प्रतिकृती स्पर्धेत सरस्वती शाळेचे छात्र सेनेचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी राजगड या किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. या किल्ले उभारणीसाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणस्नेही वस्तूंचा वापर अधिक केला आहे.

युनेस्को मध्ये समाविष्ट केलेले १२ किल्ल्यांपैकी एक किल्ला असणार आणि स्वराज्याची पहिली राजधानी म्हणुन संबोधला जाणारा गड या वैशिष्ट्यामुळे विद्यार्थ्यांनी राजगडाची प्रतिकृती साकारली. यामध्ये त्यांनी चोर दरवाजा, काळेश्वरी मंदिर, चोर वाटा, तोरण्याकडे जाणारा रस्ता, बुरबज, चंद्र तला, गुंजवणे गाव असे अनेक बारकावे दाखवण्यात आले आहे. हा किल्ला १८० चौरस किमी या भागात तयार केला आहे. २४ दिवसांच्या मेहनतीनंतर हा किल्ला पुर्णत्वास आला. २० ते २५ विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा किल्ला तयार केला.

राजगडाची भव्य प्रतिकृती शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ठाण्यातील प्राच्य विद्या संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांच्या उपस्थितीत सर्वांसाठी खुली केली जाणार आहे. ही प्रतिकृती इतिहास प्रेमी, विद्यार्थी आणि नागरिक यांना पाहता येणार आहे.