ठाणे : नौपाड्यातील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या क्रीडा संकुलात इनडोअर क्लायम्बिंग वॉल उभारण्यात आली आहे. ठाणे परिसरातील ही वॉल पहिलीच असल्याचा दावा करण्यात येत आला आहे. या वॉलचे उद्घाटन महाराष्ट्र गिर्यारोहण संघांचे अध्यक्ष उमेश झिरपे यांच्या हस्ते शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे.
साहसी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या क्रीडा संकुलात २४ बाय २४ फूट आकाराची इनडोअर क्लायम्बिंग वॉल उभारण्यात आली आहे. ठाणे परिसरातील ही पहिली इनडोअर क्लायम्बिंग वॉल असल्याचा दावा संस्थेने केला आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक चारुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही वॉल उभारण्यात आली आहे.
महाराष्ट्र गिर्यारोहण संघाचे अध्यक्ष आणि पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष उमेश झिरपे यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. झिरपे यांनी एव्हरेस्टसह आठ हजार मीटरपेक्षा उंचीच्या अनेक शिखरांवरील यशस्वी मोहिमांचे नेतृत्व केले आहे. या कार्यक्रमाला भारतीय सेनादलाचे माजी अधिकारी आणि दार्जिलिंग येथील नेहरू माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटचे माजी उपप्राचार्य निवृत्त लेफ्टनंट कर्नल योगेश धुमाळ यांची विशेष उपस्थिती असेल.
या क्लायम्बिंग वॉलमध्ये एकूण २५० होल्ड्स असून, त्याच्या माध्यमातून कृत्रिम प्रस्तरारोहणाचा सराव करता येणार आहे. डोंगरकड्यांवर प्रत्यक्ष चढाई करण्यापूर्वी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी अशा प्रकारच्या वॉलचा उपयोग होतो. साहसी खेळांमध्ये रुची असलेल्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना या सुविधेमुळे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होऊ शकते. कृत्रिम प्रस्तरारोहण या खेळाला आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही महत्त्व प्राप्त होत आहे.
उद्घाटनावेळी वॉल क्लायम्बिंगचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. साहसी खेळांची आवड असलेल्या विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सरस्वती मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी केले आहे.
