शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचार या तीन महत्त्वांच्या गोष्टींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस यांनी दिला.
राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. बदलणाऱ्या हवामानाचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी गारपिटीचा सामना बळीराजाला करावा लागतो. पीक नुकसानीमुळे कर्जबाजारीपणा वाढला आहे. अशा वेळी शेतकरी आत्महत्येसारखा मार्ग अवलंबतात; मात्र अशा संकटातही त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. देवेंद्रने यावर लक्ष देऊन काम करावे असे वाटते, असे मत देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांनी व्यक्त केले.
ठाण्यातील आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्या अत्रे कट्टय़ावर बुधवारी सरिता यांची प्रकट मुलाखत शर्वरी जोशी आणि आशा मंडपे यांनी घेतली. या वेळी श्रीमती फडणवीस यांनी ठाणेकरांसमोर मुख्यमंत्र्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, देवेंद्रचे आजोबा भाऊसाहेब हे अत्यंत सनातनी विचारांचे होते. त्यामुळे सरिता यांनी कन्या शाळेतून शिक्षण पूर्ण केले, तर पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरिता यांचे गंगाधर फडणवीस यांच्याशी लग्न झाले. त्या वेळी फडणवीस यांनी महापालिका निवडणूक जिंकली. कित्येक वर्षे विरोधी पक्षात राहूनही देवेंद्रचे वडील गंगाधर यांना कधीही पराभवाला सामोरे जावे लागले नाही. परंतु आणीबाणीच्या काळात गंगाधररावांना अटक झाली होती. गंगाधर यांच्यानंतर निवडणूक लढवण्याचा आग्रह सरितांकडे करण्यात आला होता. मात्र मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी ही विनंती नाकारली. देवेंद्रचे हे यश पाहून नागपुरात आनंदोत्सव साजरा झाला होता; परंतु तो पाहण्यास गंगाधर त्यावेळी हवे होते.

‘देवेंद्र हा वेगळा राजकारणी’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता हे दोन वेगवेगळ्या विचारधारांमधून आलेले होते. अमृताचे कुटुंब गांधीवादी विचारांचे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याही धार्मिक गोष्टींना स्थान नव्हते. तर फडणवीस कुटुंबात त्याउलट स्थिती. देवेंद्र आणि अमृताची पहिली भेट त्याच्या मित्राच्या घरी झाली. अमृताने विचारलेला पहिला प्रश्न धूम्रपान आणि मद्यपान करता का, असा होता. त्यावर सुपारीच्या खंडाचेही आपणास व्यसन नाही हे सांगितल्यानंतर हा राजकारणी वेगळा आहे, असे मत अमृता यांनी व्यक्त केल्याची आठवण त्यांनी सांगितली. आपल्या कुटुंबात मुलगी नसल्याने दिग्विजयाच्या जन्मानंतर सगळीकडेच आनंदोत्सव साजरा झाला होता, असेही त्यांनी सांगितले.