३६ तासांनंतर पाणीपुरवठा, वेळाही अनिश्चित, राष्ट्रवादीचा पालिका मुख्यालयावर मोर्चा
ठाणे : येथील वागळे इस्टेट भागातील सावरकरनगर, लोकमान्यनगर आणि पाटीलवाडी भागात गेल्या काही वर्षांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना सातत्याने पाणी टंचईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात तीव्र अशी पाणीटंचाई निर्माण झाली असून महापालिकेने आखून दिलेल्या अवधीनंतरही येथील पुरवठा पूर्ववत होत नसल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी सावरकरनगर ते महापालिका मुख्यालय असा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून त्या तुलनेत पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडू लागला आहे. त्यातच दुरुस्ती, देखभाल तसेच तांत्रिक बिघाड अशा कामांमुळे पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. वागळे इस्टेट भागातील सावरकरनगर, लोकमान्यनगर आणि पाटीलवाडी भागात गेल्या काही वर्षांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असून यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
३६ तासांनंतर पाणीपुरवठा होत असतानाही त्याच्याही वेळा निश्चित नसल्याने रहिवासी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अमित सरैया यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पालिकेवर मंगळवारी मोर्चा काढला. सावरकरनगर ते महापालिका मुख्यालय असा हा पायी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा महिला मोठय़ा संख्येने सामील झाल्या होत्या. पालिका मुख्यालयासमोर मोर्चेकऱ्यांनी मडकी फोडून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. तसेच प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दररोज जितके पाणी देता, तितकेच पाणी द्या. पण पाणीपुरवठय़ाच्या वेळा निश्चित करा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली.
मोर्चेकऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्यामुळे मोर्चेकऱ्यांनी पालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर महापालिकेचे कार्यकारी अभियंता विकास ढोले यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन घेऊन त्यांना दीड महिन्यात ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
सावरकरनगर, लोकमान्यनगर आणि पाटीलवाडी भागात गेल्या पाच वर्षांपासून पाणीपुरवठय़ाच्या वेळा निश्चित नसून ३६ तासांच्या अवधीनंतर नागरिकांना पाणी मिळते. पाण्याच्या वेळा निश्चित नसल्यामुळे महिलांना कुठेही जाता येत नाही अथवा पाणी भरण्यासाठी घरातील एका सदस्याला घरीच थांबावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी हा मोर्चा काढला.-अमित सरैया, माजी नगरसेवक