ठाणे: सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश आले असून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना अधिकृत थांबा देण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांची वर्षानुवर्षांची गैरसोय दूर होणार असून, रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि सोयीचा होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.

मुंबई, ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. यावेळी मर्यादित गाड्या असल्याने आणि आरक्षण मर्यादा असल्याने प्रवाशांना दरवर्षी मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या दृष्टीने सावंतवाडी येथे अतिरिक्त गाडयांना थांबा मिळावा यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी ही काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सावंतवाडी रोड स्थानकावर लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेस (१२२०१/१२२०२) तसेच अन्य महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी केली होती. या मागणीत त्यांनी कोकणातील नागरिकांची वाढती प्रवासी संख्या, पर्यटन, शिक्षण, रोजगार, वैद्यकीय उपचार आणि व्यावसायिक कारणांसाठी होणाऱ्या प्रवासाचा सविस्तर उल्लेख करत ही मागणी तातडीने मान्य करण्याची विनंती केली होती. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने आता सावंतवाडी रोड स्थानकावर महत्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्यास मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण तसेच परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत या गाड्यांसाठी प्रवाशांना कणकवली किंवा इतर स्थानकांवर जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि अतिरिक्त प्रवासाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता सावंतवाडी रोड स्थानकावरच या गाड्या उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.

या निर्णयाचा सर्वाधिक लाभ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे तसेच देशातील विविध भागांत शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी जाणाऱ्या युवकांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिला प्रवाशांना, रुग्णांना तसेच दिव्यांगांना होणार आहे. याशिवाय कोकणातील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग गाठणे अधिक सुलभ होणार असून, स्थानिक व्यापार, हॉटेल व्यवसाय आणि पर्यटन उद्योगालाही या निर्णयाचा सकारात्मक फायदा होईल.

या गाड्यांना मिळाला थांबा

– १२१३३ / १२१३४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मंगळुरू एक्सप्रेस

– १२४३१ / १२४३२ तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस

– १२२०१ / १२२०२ लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेस