कल्याण- कल्याण पश्चिमेतील शहाड भागात किरकोळ पाऊस पडला तरी रस्त्यावर पाणी तुंबते. शुक्रवारी दुपारी मुसळधार पाऊस पडल्यानंतर शहाड भागातील रस्त्यावर एक ते दोन फूट पाणी रस्त्यावर साचले होते. या पाण्यात एका शाळेच्या बस चालकाने बस घातली. बस रस्त्याच्या मध्यभागी गेल्यावर बंद पडली. त्यामुळे बस मधील विद्यार्थी घाबरले. पादचाऱ्यांनी साखळी करून विद्यार्थ्यांना बस मधून बाहेर काढले.

शहाड येथे गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने या भागातील रस्त्यावर पाणी साचले होते. किरकोळ पाऊस पडला तरी या भागातील रस्ते, सोसायट्यांमध्ये पाणी घुसते. हा प्रकार चार महिने चालू राहणार असल्याने कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांनी या तुंबणाऱ्या प्रश्न कायमचा सोडवून टाकावा, या मागणीसाठी शहाड भागातील रहिवासी गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरले होते. शहाड भागात अलीकडे पाणी का तुंबते याविषयी प्रशासन गांभीर्याने विचार करत नसल्याने रहिवासी संतप्त आहेत.

शुक्रवारी दुपारी मुसळधार पाऊस पडला. शहाड भागातील रस्त्यावर एक ते दोन फूट पाणी साचले. एका शाळेच्या चालकाने या तुंबलेल्या पाण्यात बस घातली. आपण पुढे निघून जाऊ असा चालकाचा विचार होता. बस रस्त्याच्या मध्यभागी जाताच इंजिनमध्ये पाणी घुसले. बस बंद पडली. बसमधील साहाय्यक, चालक घाबरले. विद्यार्थ्यांनी गलका सुरू केला. अखेर शहाड भागातील रहिवासी, पादचाऱ्यांनी बस ते रस्ता अशी साखळी केली. मुलांना दप्तरासह खांद्यावर घेऊन बसमधून बाहेर काढले. पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी रजेवर, शहर अभियंता, बांधकाम विभागाचे रस्ते कामांकडे लक्ष नाही. पालिकेचा बहुतांशी कारभार प्रभारी, प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे तळमळीने काम करणारा एकही जबाबदार अधिकारी पालिकेत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती कल्याणमधील जागरूक रहिवासी श्रीनिवास घाणेकर यांनी दिली.