निखिल अहिरे, लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : करोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने शाळा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना करोनाची लागण होऊ नये म्हणून शासनाने नियमावली आखून दिली आहे. शालेय बसमध्ये केवळ ५० टक्केच विद्यार्थ्यांना नेता येणार आहे. इंधनाचे वाढलेले भाव आणि त्या तुलनेत कमी प्रवासी वाहतुकीचे निर्बंध असल्याने शालेय बस संघटनांनी दरवाढीची मागणी केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

पूर्ण क्षमतेने विद्यार्थी वाहतुकीला परवानगी देण्यात यावी, अन्यथा ४० टक्क्यांनी दरवाढीची मागणी जिल्हा बसमालक संघटनेतर्फे करण्यात येत आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत काही बसचालकांनी प्रवासी सेवा देण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला आहे, तर काहींनी छुप्या पद्धतीने बस दरवाढ लागू केल्याने पालकांवर अतिरिक्त बोजा पडू लागला आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने  मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा १५ दिवसांपूर्वी पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र शासनाने त्यासाठी नियमावली तयार केली आहे. जे विद्यार्थी शाळेत बसने जाणार आहेत, ते एका आसनावर एकच विद्यार्थी अशा पद्धतीने प्रवास करतील. यासंबंधी पालकांनी आणि वाहनचालकांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये केवळ ५० टक्के क्षमतेनेच वाहतूक करावी लागणार आहे. शाळा सुरू झाल्याने अर्थचक्र रुळावर येईल, अशी आशा सर्व बसमालकांना होती. संपूर्ण क्षमतेने विद्यार्थी वाहतुकीला परवानगी मिळाली नसल्याने बसमालकांचा हिरमोड झाला आहे. बस सुरू केल्या तर विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी अधिकच्या फेऱ्या माराव्या लागणार आहेत. त्यात मागील काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. अधिकच्या फेऱ्या आणि इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ वाढ यांमुळे सध्या शालेय बस चालविणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याचे बसमालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने विद्यार्थी वाहतुकीला परवानगी आणि ४० टक्क्यांनी दरवाढ होत नाही तोपर्यंत शालेय बस चालविणार नसल्याचा पवित्रा या संघटनांनी घेतला आहे.

पालकांना आर्थिक भुर्दंड

विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालक काही छोटय़ा आणि खाजगी गाडय़ांच्या पर्याय स्वीकारतात. हे छोटे गाडी मालक त्यांच्या गाडीच्या क्षमतेनुसार १० ते १५ विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. या वाहनांच्या मालकांनी त्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ केली आहे. एकीकडे बस बंद आणि दुसरीकडे लहान वाहनांनी केलेली दरवाढ यांमुळे पालकवर्ग कोंडीत सापडला आहे.

पूर्ण क्षमतेने विद्यार्थी वाहतुकीला परवानगी देण्याबरोबरच ४० टक्क्यांनी भाडय़ाच्या दरात वाढ करण्याची आमची मागणी आहे, तरच बस मालकांना आर्थिकदृष्टय़ा परवडेल. या मागणींमुळे शालेय बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

– राजेश पुजारी, सचिव, ठाणे जिल्हा बस मालक संघटना