ठाणे : नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेत दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारल्याच्या प्रकरणावर शाळा प्रशासनाने शिक्षिकेला निलंबित केले आहे. आता, या शिक्षिकेवर निलंबनाची कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे पालकांनी संयम बाळगावा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही सदैव सजग आहोत, अशी भूमीका शाळा प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेत काही दिवसांपूर्वी दुसरीत शिकणारा विद्यार्थी शिक्षिकेने मारल्याने तणावात गेल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या डोक्यात स्टीलच्या छडीने मारले होते. त्यामुळे विद्यार्थ्याच्या डोक्यात रक्तस्त्राव झाला. तसेच त्याने लिखाण केलेल्या वहीचे पान फाडून त्याला वर्गात लिखाण करुन दिले नाही. विद्यार्थी तणावात आल्याने मुलाच्या पालकांनी याप्रकरणी पंकजा राजे या शिक्षिकेविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच या शिक्षिकेविरोधात इतर पालकांकडूनही अश्याच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या. सर्व पालकांकडून आलेल्या तक्रारींनंतर संस्थेने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. शाळेच्या मुख्याध्यापक यांनी शानभाग यांना नोटीस देऊन चार दिवसांत खुलासा मागितला होता. यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर केला. त्यानंतर, ठाणे महापालिका शिक्षणाधिकारी यांनी शाळेला योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, २० ऑगस्ट रोजी सर्व संबंधित व्यक्तींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत पालक, संस्थेचे विश्वस्त, पालक शिक्षक संघटना, मानसोपचारतज्ज्ञ, आणि शिक्षणतज्ञ यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शिक्षिका पंकजा शानभाग यांच्या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही विश्वास्तांनी या बैठकीत दिली. संस्थेने शिक्षणाधिकारी यांच्याकडे या शिक्षिकेच्या निलंबनासाठी पूर्वपरवानगी मागितली होती, ज्यास २३ ऑगस्ट रोजी मान्यता देण्यात आली. त्यानुसार, या शिक्षिकेवर निलंबनाची कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा…ठाणे : जिल्ह्यात मलेरिया, डेंग्युची साथ; अतिसार, स्वाईन फ्लु आणि लेप्टोचे रुग्ण आढळले

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही सदैव सजग आहोत. त्यामुळे आम्ही पालकांना विनंती करतो की, त्यांनी संयम बाळगावा आणि संस्थेवर विश्वास ठेवावा. सरस्वती मंदिर ट्रस्ट विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते आणि भविष्यातही त्याचप्रकारे काम करत राहील. -सुरेंद्र दिघे, कार्यकारी विश्वस्त, सरस्वती मंदिर ट्रस्ट