वाडा : अनुदानित, विनाअनुदानित  शाळेतील ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे.  त्यांनाच यापुढे शालेय पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे अजूनपर्यंत आधार कार्ड नाही त्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची जबाबदारी शिक्षकांवर दिली आहे. वेगवेगळय़ा प्रकारच्या कामांची जबाबदारी असलेल्या शिक्षकांवर आणखीन या कामाची भर पडली आहे.

शालेय पोषण आहार घेण्यासाठी जानेवारी २०२३ पासून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.  प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शालेय पोषण आहाराशी जोडण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आले आहेत.  त्यामुळे जानेवारी २०२३  पासुन ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे अशा विद्यार्थ्यांनाच पोषण आहाराचा लाभ दिला जाणार आहे.  आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत काढून ती शालेय पोषण आहाराशी जोडावीत, असे आदेश शिक्षण विभागाकडून  शिक्षकांना दिल्याने आधार कार्ड केंद्रात अथवा तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जावे लागत आहे. शाळा आणि आधार कार्ड केंद्र अशी धावपळ शिक्षक करताना दिसत आहेत.

वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाभार्थ्यांचा माहितीसाठा म्हणजे डेटाबेस तयार करून तो आधार कार्डशी जोडावा लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आवश्यक आहे. प्रत्येक महिन्याच्या २८ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे जानेवारी २०२३ पासून प्रत्येक विद्यार्थ्यांकडे  पोषण आहार लाभासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांची आधार कार्ड काढण्याचे कामे शिक्षक करीत असताना दिसत आहेत.  कागदपत्रे पालकांकडे अपूर्ण असणे, विद्यार्थाच्या बोटाचे ठसे न उमटणे, अशा तांत्रिक अडचणी येत असल्याने हे काम शिक्षकांना त्रासदायक ठरत आहे. 

आधारकार्ड पोषण आहाराशी जोडण्या संदर्भात  परिपत्रक आले आहे. या बाबतची अंमलबजावणी कशी करायची हा विषय पुढील मीटिंगमध्ये घेतला जाईल. 

-भगवान मोकाशी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वाडा.