scorecardresearch

पर्यावरणपूरक होळीसाठी शाळांचा पुढाकार

करोनाचा प्रादुर्भाव घटल्यामुळे दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा होळी आणि धुळवडीचा जल्लोष वाढण्याची चिन्हे आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

पूर्वा साडविलकर

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव घटल्यामुळे दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा होळी आणि धुळवडीचा जल्लोष वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र, होळीचा आनंद साजरा करताना पर्यावरणाला गालबोट लागू नये, यासाठी ठाण्यातील शाळांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे, नैसर्गिक रंगनिर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

करोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे होळी तसेच रंगपंचमी हे सण साजरे करता आले नव्हते. यंदाच्या वर्षी करोना प्रादुर्भाव ओसरला असून बाजारात होळीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी होळी आणि रंगपंचमी उत्साहात साजरे होण्याची शक्यता आहे.  मात्र, रासायनिक रंगांचा वापर, वृक्ष तोडणे, पाण्याचा बेसुमार वापर अशा कृत्यांद्वारे होळी आणि  धुळवडीच्या उत्साहाचा पर्यावरणाला फटका बसण्याची भीती असते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पर्यावरणप्रेमी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे.

ठाण्यातील बेडेकर विद्यालयात दरवर्षी होळीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या माध्यमातून नैसर्गिक रंग निर्मितीच्या कार्यशाळेचे आयोजन केले जाते. नैसर्गिक रंग निर्मितीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी कोणी विद्यार्थी इच्छुक असेल तर, त्या विद्यार्थ्यांला पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेत जाण्यास सांगितले जात आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना अडसुळे यांनी दिली. लोकमान्यनगर भागातील रा.ज. ठाकूर शाळेतही होळीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक डी.आर. पाटील यांनी दिली. भिवंडीतील राहनाळ जिल्हा परिषद शाळेतही दरवर्षी या   सणानिमित्त शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यंदाही हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती शाळेचे मुख्यध्यापक अजय पाटील यांनी दिली.

कल्याणमधील गजानन विद्यालयात कार्यशाळा संपन्न

कल्याण येथील श्री गजानन विद्यालयात नुकतीच नैसर्गिक रंग निर्मिती आणि त्याचा वापर कसा करावा या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. सुभेदार वाडा कट्टा आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 

पोलीस यंत्रणाही सज्ज

होळी वा धुळवडीदरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. गृहसंकुलातील गच्चीमधून पादचाऱ्यांवर फुगे फेकणाऱ्यांवर तसेच विनाकारण एखाद्या व्यक्तीवर रंग उडवल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.  मध्य रेल्वेच्या पारसिक बोगद्यावरही मोठय़ा प्रमाणात वस्ती आहे. येथील नागरिकांकडूनही रेल्वे गाडय़ांवर रंगानी भरलेले फुगे किंवा पिशव्या रेल्वे प्रवाशांच्या दिशेने भिरकावल्या जातात. असे प्रकार टाळण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी भोंग्याद्वारे उद्घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पोलिसांची या भागात चौकी असून गस्तही घालण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. खडकीकर यांनी दिली.

धुलिवंदन निमित्ताने आमच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त शहरात असणार आहे. तसेच गृहसंकुलांमधील रहिवाशांनी नियमांचे उल्लंघन करू नये असा सूचना करत आहोत. आमचे गस्ती पथकही शहरात गस्त घालणार असून एखाद्या व्यक्तीची तक्रार आल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल. 

– अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर पोलीस.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Schools initiative environmentally friendly holi organizing various programs public awareness students ysh

ताज्या बातम्या