tn03मा मार्च २००० च्या शालान्त परीक्षेत उत्तम मार्क्‍स आणि मराठी विषयात मुंबई विभागात सर्वाधिक मार्क्‍स मिळाले म्हणून मानसी सदानंद आपटे या मुलीला जिज्ञासा ट्रस्टच्या वतीने जिज्ञासा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार केवळ तिला मिळालेल्या गुणांसाठी नव्हता तर परीक्षेच्या काळात दुर्धर आजाराला तोंड देत रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेत असताना दाखवलेल्या जिद्दीला होता.
सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये सहावीत शिकत असताना १९९५ साली तिच्या गटाने ठाण्यातील ध्वनिप्रदूषणावर संशोधन करून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत प्रकल्प सादर केला होता. त्या वेळी ध्वनिप्रदूषणाबद्दल महाराष्ट्रात तेवढी जागृती होत नव्हती. अशा काळात सहावीतील विद्यार्थिनींनी हा प्रकल्प निवडून दूरदृष्टीचे प्रत्यंतर दिले. त्यांचा प्रकल्प गोहत्ती इथे झालेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवडला गेला होता. त्यानंतर १९९७ साली तिने ‘मधल्या सुट्टीतील डबा’ या विषयावर प्रकल्पात सहभाग घेतला. त्या वर्षीसुद्धा त्यांचा प्रकल्प राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी पात्र ठरला. हे प्रकल्प करत असताना आणि राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या संपर्कात आल्यानंतर मानसीमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण झाली.
दहावीच्या परीक्षेत मराठीत सर्वाधिक गुण मिळवल्यानंतर मानसीचा ओढा कला शाखेकडे असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, विज्ञानाच्या गोडीमुळे तिने केळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तिच्या विज्ञान संशोधकवृतीला खरा फुलोरा आला तो पदवीसाठी सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय घेऊन राम नारायण रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर विभागाचे प्रमुख  प्रा. रवी फडके, प्रा. लीना फडके यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे या विभागात विज्ञान संशोधनाला पूरक वातावरण होते. या तीन वर्षांत लहानमोठय़ा प्रकल्पांत मानसीचा सहभाग होताच. परंतु फडके सरांच्या ओळखीमुळे खाजगी संशोधन प्रयोगशाळेत काम करण्याचा अनुभवपण मिळाला. तिचा पदवी अभ्यासक्रम केवळ सूक्ष्मजीवशास्त्रावर नव्हता तर जैवजीवशास्त्र तंत्रज्ञानाचापण त्यात अंतर्भाव होता. सरांच्या मार्गदर्शनामुळे आधुनिक जैवतंत्रज्ञानाची ओळख त्यांच्या विद्यार्थ्यांना साहजिकच चांगल्या प्रकारे झाली. पदवी परीक्षेत मानसी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात विद्यापीठात दुसरी आली. एम.एस्सी. करताना तिने सूक्ष्मजीवशास्त्र विषय घेऊन बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात प्रवेश घेतला. अंतिम परीक्षेत सुवर्ण पदक मिळवण्यासोबतच तिने अनेक ‘फेलोशिप’ही मिळवल्या. ‘जीआरई’ची परीक्षा देऊन तिने अमेरिकेतील डेट्रोइड येथील वेन स्टेट युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवला. येथे पीएच.डी.साठी तिने जनुकशास्त्रातील विषय निवडला. तेथील प्रा. व्हिक्टोरिया मेलर तिच्या मार्गदर्शक होत्या.
प्राध्यापक डॉ. मेलर यांच्या मार्गदर्शनाखाली केमरांच्या [fruitfly]  डीएनएचा अभ्यास  करताना  मानसीला प्रश्न पडला की आपले िलग नर वा मादी आहे हे सजीवांमधील प्रत्येक पेशीला व जनुकांना कसे कळते व याचे नियमन कोण करते? संशोधन करताना मानसीला काही आश्चर्यजनक निरीक्षणे मिळाली. काही केमरांच्या जनुकांमध्ये काही अचानक बदल केले तर फक्त नर केमरांच्या मध्ये त्यांचे परिणाम आढळले, परंतु मादी केमरांमध्ये हे बदल झाले नाहीत. ‘हेटरोक्रोमोटीन’बाबत संशोधन करताना असे लक्षात आले की केमरांमधील दर्शनीय वैशिष्टय़ दाखवणारी जनुके ही िलगभेद करणारी गुणसूत्रे [क्रोमोझम] नियंत्रित करीत नाहीत तर याचा संबध हेटरोक्रोमोटीनशी संबधित आहे. हे हेटरोक्रोमोटीन सजीवांमधील नर व मादी पेशींमध्ये वेगवेगळे दर्शविले जाते. हे का व कसे होते याचे उत्तर अजूनपर्यंत मिळाले नव्हते. याचे कारण शोधणे हाच मानसीच्या पीएच.डी.चा संशोधनाचा विषय ठरला.
पुढील संशोधनातून केमरांच्या गुणसूत्राशी संबधित काही विशिष्ट प्रक्रिया आणि तोपोआयसोमरेस (Topoisomerase II)या एन्झाइममधील काही वैशिष्टय़े तिच्या लक्षात आल्या ज्या अगोदर सिद्ध झाल्या नव्हत्या. सजीवामधील िलगभेद फक्त एकाच ठरवून न दिलेल्या प्रक्रियेने होतो, असा तोवरच वैज्ञानिक समज होता. पण केमरे आणि माणसामधील काही वंशपरंपरागत वैशिष्टय़े एका दुसऱ्या मार्गाने नियमित होतात. ती लिंगभेद ठरवणाऱ्या प्रक्रियेपासून वेगळी असतात, हे मानसीच्या संशोधनाने सिद्ध केले. या विषयावर तिचे दोन पेपर्स प्रसिद्धही झाले आहेत.
मानसी सध्या डॉ. जुलिया कूपर यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटमध्ये पोस्ट डॉक्टरेटचा अभ्यास करत आहे.  बुरशीचा एक प्रकार असलेल्या ‘यीस्ट’वर तिचे संशोधन सुरू आहे. तिने आपले संशोधन गुणसूत्राच्या शेवटी असलेल्या घटकावर ज्याला टिलोमिअरवर केंद्रित केले आहे. टिलोमिअर गुणसूत्राचा टोक सांभाळत असल्याने त्यांच्याशिवाय पेशी मरून जातात. म्हणजेच आपले जीवन टिलोमिअरवर अवलंबून असते.
मानसी काम करत असलेल्या प्रयोगशाळेत असे सिद्ध झाले आहे की टिलोमिअर एन्झाइम  नसतानासुद्धा काही पेशी जिंवत राहू शकतात. या पेशींना ‘हाती’ (HAATI) म्हणतात. सध्या मानसी याच ‘हाती’  प्रकारच्या पेशीवर मूलभूत संसोधन करीत आहे. या संशोधनाचा उपयोग पुढे कॅन्सरच्या पेशीच्या सजीवांच्या शरीरात होणारा अमर्याद व अबंधनकारक प्रसार  रोखण्यासाठी होऊ शकतो. या मानसीच्या प्रयोगशाळेने काढलेले हे निष्कर्ष जनुकशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, असे मत तिच्या रुईया कॉलेजमधील प्राध्यापिका लीना फडके यांनी दिले आहे.
विज्ञानाच्या इतिहासातील गेली काही शतके पदार्थ, रसायन, अणू तथा संगणकीय व दूरसंचार शास्त्रांवर संशोधन करण्यात गेली आहेत. या विषयातील संशोधनाने मानवी इतिहासात क्रांती झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार २१ वे शतक हे खगोलीय पदार्थविज्ञान व अतिसूक्ष्मजीवशास्त्र व नॅनो टेक्नॉलॉजीच्या संशोधनाचे आहे. या शतकातील वरील दोन्ही शास्त्र विषयातील संशोधन मानवाच्या पुढच्या प्रगतीची दिशा ठरविणार आहे.
सुरेंद्र दिघे