ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील अपघातात पाच प्रवाशांचा उपनगरीय रेल्वेगाड्यांतून पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणात मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांविरोधात ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला आहे. मंगळवारी या अर्जावर सुनावणी पार पडली. सुमारे एक तास दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने अटकपूर्व जामीनावर आज, बुधवारी आदेश देणार असल्याचे म्हटले.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील वळण मार्गावर कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणारी आणि सीएसएमटी येथून कर्जतच्या दिशेने वाहतुक करणारी रेल्वेगाडी एकाचवेळी आल्यानंतर अपघात झाला होता. ‘व्हिजेटीआय’ संस्थेने दिलेल्या अहवालानंतर मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि साहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यासह इतरांविरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. समर यादव आणि विशाल डोळस यांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी दुसऱ्यांदा न्यायाधीश गणेश टी. पवार यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. साहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर शिरसाट, मध्य रेल्वेचे अधिकारी या सुनावणीवेळी उपस्थित होते.
शिरसाट यांनी न्यायाधीशांकडे दोन्ही अभियंत्यांची कोठडी हवी असल्याची विनंती केली. तसेच ‘व्हिजेटीआय’च्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे न्यायाधीशांसमोर मांडत येथील रुळांवर पाणी साचणे, नाल्याचा मुद्दा उपस्थित करत तसेच अभियंत्यांना सूचना मिळूनही त्यांनी काम केले नाही असा उल्लेख केला. तर अभियंत्यांचे वकील बलदेवसिंह राजपुत यांनी अपघाताचे ठिकाणी आणि नाला खूप अंतरावर असल्याचा युक्तीवाद केला. तसेच काही छायाचित्र त्यांनी न्यायाधीशांकडे सादर केली. अपघात घडला तेव्हा रेल्वेगाडी १२ मिनीटे उशीराने होती. तसेच रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांना जबाबासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात वारंवार पत्र पाठवूनही रेल्वे अधिकारी उपस्थित राहिले नाही असे शिरसाट म्हणाले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने बुधवारी याबाबतचा आदेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
अपघात घडला तेव्हा रेल्वेगाड्यांच्या दरवाजात प्रवासी उभे होते. गर्दी आणि बॅगांमुळे हा अपघात झाल्याचा युक्तीवाद अभियंत्यांच्या वकिलांनी केला. तर पंचनामा केला त्यावेळी कोणतीही बॅग आढळली नाही असे शिरसाट यांनी न्यायाधीशांसमोर मांडले.
अपघात घडल्यानंतर वारंवार पत्र पाठवूनही मध्य रेल्वेने त्यांचा अहवाल रेल्वे पोलिसांना सादर केला नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी रेल्वेचा अहवाल आम्हाला दिला असे शिरसाट यांनी म्हटले. या बाबत न्यायाधीशांनी विचारल्यानंतर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे याचे उत्तर नव्हते. तसेच रेल्वे रुळांचे माप देखील घेतले नसल्याचे सांगत अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडल्याचे शिरसाट यांनी न्यायालयासमोर मांडले.चौकटअपघातापूर्वी आणि अपघातानंतर अनेक रेल्वेगाड्या या रुळांवरुन धावल्या. परंतु त्या रेल्वेगाड्यांचा अपघात झाला नाही असा युक्तीवाद अभियंत्यांच्या वकिलांनी केल्यानंतर एकाचवेळी दोन रेल्वेगाड्या एकमेकांच्या बाजूने धावल्या का, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. त्याचेही उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांकडे नव्हते. याबाबतची माहिती घेऊन न्यायालयात सादर करु असे त्यांनी सांगितले. तर अपघातावेळेचे चित्रीकरण रेल्वे पोलिसांनी न्यायाधीशांना दाखविले.
