कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांतील युतीची शक्यता कमालीची दुरावली असून पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या नेतृत्वाखाली ‘मातोश्री’वर गेलेल्या शिवसेनेच्या शिलेदारांना सन्मानपूर्वक तोडगा निघत नसेल तर स्वबळावर लढण्यास सज्ज राहा, असा स्पष्ट संदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

‘मातोश्री’वरील ही बैठक संपवून ठाणे, कल्याणात परतलेल्या शिवसेना नेत्यांनी तातडीने १२२ प्रभागांमध्ये उमेदवार निवडण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे. भाजपने यापूर्वीच यासंबंधीची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, बैठकीपूर्वीच युतीसंबंधीच्या दोन्ही पक्षांतील बैठका मंदावल्या असून गेल्या काही दिवसांत जागावाटपाची कोणतीही ठोस चर्चा झालेली नाही, अशी माहिती या दोन्ही पक्षांतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
महापालिकेच्या कारभाराविषयी स्थानिक रहिवाशांमध्ये कमालीची नाराजी असल्याने यंदा काहीही झाले तरी युती व्हावी यासाठी पालकमंत्री एकनाथ िशदे स्वत: आग्रही आहेत. युती झाली नाही तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संघर्ष करावा लागेल, हे स्पष्ट असल्याने शिवसेनेचे स्थानिक नेते, आमदार काहीसे बचावात्मक भूमिकेत दिसू लागले आहेत. काही दिवसांपासून काहीही झाले तरी युती करा, असे आर्जव घेऊन शिवसेना नेते भाजप नेत्यांचे उंबरठे झिजवताना नजरेस पडत आहेत. तरीही भाजपकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने स्वबळाचा निर्णय होईल, असे संकेत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत िशदे, राजन विचारे, आमदार सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भिवंडीचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि ठाणे स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के हे नेते उपस्थित होते.