डोंबिवली – कोकणातील मालवण येथील मूळ रहिवासी असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने डोंबिवलीतील राजाजी पथावरील एका बँकेच्या एटीएममधून डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका भुरट्या चोराने एटीएममध्ये आपण पैसे काढत असताना उलटसुलट बटणे दाबली. त्यानंतर आपल्या बँक खात्यामधून ८८ हजार रूपये या भुरट्याने काढून घेतल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकाने रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे.
महेंद्र रामचंद्र जोशी (६२) असे तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरागाव पिरावाडी येथील रहिवासी आहेत. ते काही कामानिमित्त गेल्या महिन्यात डोंबिवलीत आले होते. पैशाची गरज होती म्हणून तक्रारदार महेंद्र जोशी यांनी जवळील एटीएम कार्डच्या माध्यमातून पैसे काढू असा विचार केला.
ते गेल्या महिन्यात संध्याकाळच्या वेळेत डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथावरील रामनगर भागातील एका बँकेच्या एटीएममध्ये गेले. तेथे डेबिट कार्डच्या माध्यमातून ते पैसे काढत होते. तेवढ्यात त्यांच्या पाठीमागून एक इसम आला. त्याने आपणास पैसे काढायचे आहेत असे दाखवून तो तक्रारदार महेंद्र यांच्या पैसे काढण्याच्या हालचाली पाहू लागला. महेंद्र यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. दरम्यान त्या इसमाने जबरदस्तीने पुढाकार घेऊन तो महेंद्र जोशी यांच्या जवळ आला. त्याने जोशी पैसे काढत असतानाच एटीएम मशिनची काही बटणे उलटसुलट पध्दतीने दाबली. एटीएममध्ये मशिनमध्ये छेडाछेड केली.
दरम्यानच्या काळात महेंद्र यांना तो अनोळखी इसम मशिनमध्ये कसा बिघाड झाला आहे. पैसे कसे आता बाहेर येणार नाहीत असे सांगू लागला. आणि आपणास त्या एटीएम मशिनमधील यंत्राचे सर्व बारकावे माहित आहेत असा देखावा उभा केला. या कालावधीत त्या अनोळखी इसमाने महेंद्र जोशी यांच्या एटीएमचा कार्ड क्रमांक आणि गुप्त संकेतांक पाहिला होता. त्याचा गैरफायदा घेत या भामट्याने जवळील बनावट एटीएम कार्ड बोलाचाली करत महेंद्र जोशी यांच्या हातात टेकले. आपण तुमचे खरे एटीएम कार्ड दिले आहे असे दाखवून तो भामटा इसम एटीएममधून बाहेर पडला. त्यानंतर त्या भामट्याने इसमाने जोशी यांच्या बँक खात्यामधून एकूण ८८ हजार रूपये एटीएमच्या माध्यमातून टप्प्याने काढून घेतले.
आपण एवढी मोठी रक्कम बँकेतून काढली नाही. तरीही आपणास बँकेतून पैसे काढल्याचे लघुसंदेश का आले असे प्रश्न महेंद्र जोशी यांना पडले. त्यांनी बँकेत चौकशी केली तेव्हा त्यांना त्यांच्या बँक खात्यामधून रक्कम काढल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी जोशी यांना त्या अनोळखी इसमाने ही रक्कम काढली असल्याचा संशय आला. त्यांनी त्या इसमा विरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली.
