कल्याण : कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्ता भागात राहत असलेल्या एका ७३ वर्षाच्या वृध्द व्यावसायिकाला वाढीव नफ्याचे आमिष दाखवून शेअरमध्ये ऑनलाईन माध्यमातून गुंतवणूक करण्यास भाग पाडून दोन महिलांनी ६१ लाख ९० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. मागील तीन महिन्याच्या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
दिनेश जगजीवन शहा (७३) असे फसवणूक झालेल्या वृध्द व्यावसायिकाचे नाव आहे. ते कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्ता भागात राहतात. त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. दिनेश शहा यांनी या फसवणूक प्रकरणी नेहा पटेल आणि तृप्ती गोहर या दोन महिलांच्या विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या दोन्ही महिलांचे पोलीस ठाण्यातील तक्रारीत दाखल करण्यात आलेले मोबाईल क्रमांक बंद येत आहेत.
कल्याण, डोंंबिवली परिसरात ज्येष्ठ, वृध्द महिला, पुरूष यांंना लक्ष्य करून भुरटे गुंतवणूक सल्लागार ऑनलाईन माध्यमातून आर्थिक फसवणूक करत आहेत. मागील काही महिन्यांपासून हे प्रकार वाढू लागले आहेत. विशेष करून मध्यमवर्गियांची वस्ती असलेल्या भागातील रहिवाशांंना हे भुरटे गुंतवणूक सल्लागार सर्वाधिक लक्ष्य करत आहेत.
महात्मा फुले पोलीस ठाण्यातील तक्रारीत दिनेश शहा यांनी म्हटले आहे, की एप्रिल महिन्यात दोन महिलांंनी आपल्याशी व्हाॅटसप मोबाईलवरून संपर्क साधला. आपणास एसीआय इन्व्हेस्टमेंट या व्हाॅटसप गुप्रमध्ये समाविष्ट केले. या ग्रुपच्या माध्यमातून ते शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास कसा वाढीव नफा मिळतो याचे सल्ले देऊ लागले. अनेक गुंतवणूक सदस्य या व्हाॅटसप ग्रुपमध्ये होते.
आपणास शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास वाढीव नफा मिळेल असे आश्वासन एसीआय इन्व्हेस्टमेंट व्हाॅटपग्रुपच्या माध्यमातून नेहा पटेल आणि तृप्ती गोहर या गुंतवणूक सल्लागारांनी दिले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मी त्यांनी दिलेल्या विविध बँक खात्यावर टप्प्याने एप्रिल ते जून या कालावधीत एकूण ६१ लाख ९० हजार रूपयांची गुंतवणूक ऑनलाईन माध्यमातून केली.
दोन्ही महिलांनी दिलेल्या निर्धारित वेळेत आपण वाढीव नफा देण्याची मागणी त्यांच्याकडे करू लागलो. त्यावेळी आपणास विविध कारणे देऊन रक्कम काढण्यास मज्जाव करण्यात आला. आपली मूळ रक्कम आपण काढण्याचा प्रयत्न केला. त्यातही आपणास अडथळे आणले गेले. सतत मागणी करूनही या दोन्ही महिला वाढीव नफा नाहीच, पण आपली मूळ रक्कम परत करत नव्हत्या.
त्यांनी गुंतवणुकदाराच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर दिनेश शहा यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक नांगरे याप्रकरणाचा तपास करत आहेत.