डोंबिवली – डोंबिवलीत सावरकर रस्त्यावर एका गृहसंकुलात राहत असलेल्या एका ७८ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यामधून ऑनलाइन व्यवहार करत भामट्यांनी एकूण ६ लाख १२ हजार रूपयांची रक्कम टप्प्याटप्प्याने काढून घेतली. दर महिन्याला कल्याण, डोंबिवलीत या माध्यमातून भामटे चार ते पाच जणांना लाखो रूपयांचा गंडा घालून त्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे.

या आर्थिक फसवणूक प्रकरणात डोंबिवली पूर्व सावरकर रस्त्यावरील एका गृहसंकुलात राहत असलेल्या श्रीकांत वामन कानिटकर (७८) यांची फसवणूक झाली आहे. तक्रारदार कानिटकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या शुक्रवारी मी घरात सकाळच्या वेळेत टिव्ही पाहत बसलो असताना मोबाइलवर काही लघुसंदेश आले. त्यावेळी मला बँक खात्यामधून ९९ हजार ५०० रूपये काढल्याचे कळाले. त्या पाठोपाठ ५० हजार, ३० हजार रूपये काढल्याचे संदेश आले.

आपण बँकेतून पैसे काढले नसताना ही रक्कम काढली जात असल्याचे लक्षात आल्यावर तातडीने एचडीएफसी बँकेत व्यवहार थांबविण्यासाठी गेलो असता खात्यामधून आणखी १९ हजार रूपये वळते केल्याचे समजले. खात्यामधून एकूण ६ लाख १२ हजार रूपयांची रक्कम काढली असून या प्रकरणी आर्थिक फसवणूक झाली असल्याने सायबर गुन्हा दाखल करण्यात आला.