ठाणे – ज्येष्ठ विचारवंत, संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रामायण-महाभारताचे व्यासंगी दाजी पणशीकर यांचे शुक्रवारी ठाण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अत्यंत प्रगल्भ, सखोल विचार करणारे आणि समाजप्रबोधनासाठी जीवन वाहिलेले व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

दाजी पणशीकर यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, मुलगा, जावई व सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ९.३० वाजता ठाणे पश्चिम येथील जवाहर बाग स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

लहानपणापासूनच पौराहित्यात रमलेल्या दाजींचे मूळ नाव नरहरी पणशीकर होते. दाजींचे आठवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतील रात्र शाळेत झाले.दाजी यांचा विचार, लेखन आणि व्याख्यानांचा प्रभाव गेली पाच दशके महाराष्ट्राच्या बौद्धिक जीवनावर अधिराज्य करत होता. आजोबा वासुदेवशास्त्री पणशीकर यांच्याकडून मिळालेल्या हिंदू धर्मग्रंथ आणि परंपरांचा ठेवा त्यांनी अधिक सखोलतेने पुढे नेला. देश-विदेशात त्यांनी सुमारे २,५०० हून अधिक व्याख्याने दिली.

‘महाभारत : एक सूडाचा प्रवास’, ‘कर्ण खरा कोण होता?’, ‘कथामृतम’, ‘कणिकनिती’, ‘स्तोत्रगंगा’ (२ भाग), ‘अपरिचित रामायण’ (५ भाग), तसेच ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर : आदिशक्तीचा धन्योद्गार’ यांसह त्यांच्या अनेक ग्रंथांच्या ३० हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचे लेखन ‘मराठा’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘सामना’ या दैनिकांतून प्रकाशित होत होते. ‘सामना’मध्ये सलग १६ वर्षे त्यांनी विविध वैचारिक लेखमाला लिहिल्या होत्या. स्पष्ट भूमिका, परखड विश्लेषण, आणि सखोल चिंतन ही त्यांची शैली होती. मोठे बंधू आणि प्रसिद्ध रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा नाट्यसंस्थेचे व्यवस्थापन करत असताना त्यांचा मराठी साहित्य, संगीत, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांशी घनिष्ठ संबंध होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दाजी पणशीकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक विश्वातील एक उज्वल दीप मालवला आहे. त्यांच्या निधनाने गेल्या ५० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास जपणारे एक व्यक्तिमत्व हरपल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे.