कल्याण : शहापूर तालुक्यातील शेणवे गावचे ज्येष्ठ वारकरी, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल धर्मा वरकुटे यांचे गुरूवारी रात्री शेणवे येथील त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मागील अनेक वर्ष माळकरी असल्याने आणि धार्मिक विषयातील कीर्तन, प्रवचन, अध्यात्म, साधूसंत यांचा प्रचंड ओढा असल्याने विठ्ठल वरकुटे नियमित धार्मिक कार्यात व्यस्त असत. अनेक वर्ष ते पंढरपुरच्या वारीला वारीतून जात होते. ज्येष्ठ वारकरी म्हणून ते ओळखले जात होते. गावात पाटील या नावाने ओळखले जात होते. गाव परिसरातील सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा असायचा.

बेघर, अनाथ यांना सहकार्य करण्यासाठी ते पुढाकार घेत असत. एखाद्या देवस्थानच्या माध्यमातून त्या व्यक्तिला मदत मिळण्यासाठी ते सहकार्य करायचे. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्याच्या राज्याच्या विविध भागात होणाऱ्या कीर्तन, प्रवचन, श्रीमद्भागत, हरिनाम सप्ताहात त्यांची प्राधान्याने उपस्थिती असायची. ९१ वर्षाचे वय असुनही ते पायी प्रवास करत असत.

पावसाळ्यात शेतीच्या हंगामात लागवडीसाठी ते स्वत राबत असत. त्यानंतर रब्बी हंगामात वाल, हरभरा आणि इतर कडधान्य पिकविण्यासाठी ते स्वता मेहनत घेत असत. एक कसलेला शेतकरी म्हणूही त्यांची ओळख होती. कठोर परिश्रम, मेहनत करून त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली होती. शेणवे येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आहे. यावेळी अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.