पोलीस अधिकाऱ्यांमधील अंतर्गत धुसफुस टोकाला

ठाणे पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या काही बदल्या रखडल्यामुळे अनेक पदे रिक्त होती.

|| किशोर कोकणे

ठाणे पोलीस दलात सेवाज्येष्ठतेला बगल देऊन बदल्या

ठाणे : ठाणे पोलीस दलातील बदल्यांच्या रखडलेल्या प्रकारानंतर आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलत कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना काही पोलीस ठाण्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा पदभार देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे सेवेत वरिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत धुसफुस निर्माण झाली आहे. 

ठाणे पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या काही बदल्या रखडल्यामुळे अनेक पदे रिक्त होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विसंवादामुळे या बदल्या रखडल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेक पोलीस अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत नाराजी निर्माण झाली होती. ही नाराजी बाहेर पडताच गुन्हे अन्वेषण शाखा, वाहतूक आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र, या बदल्या आता पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे.

आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्यांमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून त्यांच्याऐवजी सेवेत त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदभार देण्यात आला आहे. यामध्ये पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील काही मलईदार पोलीस ठाण्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे सेवाज्येष्ठता असतानाही काही पोलीस निरीक्षकांना त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे लागत आहे. अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेत चार ते पाच वर्षे कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठता असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकारमधील नेतेमंडळींचीही भेट घेतली, तर काही पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांचीही भेट घेतली. मात्र त्यांच्याकडूनही ठोस आश्वासन या अधिकाऱ्यांना मिळत नसल्याने पोलीस अधिकाऱ्यांची धुसफुस वाढू लागली आहे. आम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा पदभार द्या, परंतु आमच्यावर अन्याय करू नका, असे वरिष्ठ अधिकारी खासगीत बोलत आहेत. या संदर्भात सेवाज्येष्ठता डावललेल्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आमची नाराजी वरिष्ठांच्या कानावर घातली आहे असे त्यांनी सांगितले. नियुक्त्या देणे हा वरिष्ठांचा अधिकार असला तरी सेवाज्येष्ठता डावलून त्या दिल्या जात असल्याने अनेक अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे, असेही यापैकी काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

या संदर्भात पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्याशी फोनद्वारे तसेच लघुसंदेशाद्वारे संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Seniority in thane police force paid internal among police officers akp

Next Story
काय, कुठे, कसं?
ताज्या बातम्या