बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर मधील प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. जीन्स धुलाई कारखान्यातील सांडपाण्याच्या समस्येबाबत शासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे.

कमी खर्चात, हुबेहूब वस्तू तयार करण्याची लबाडी उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यांनी अंगी बाणवली आहे. या वस्तूंची उल्हासनगरात एक वेगळी बाजारपेठ तयार झाली आहे. यामध्ये कापड निर्मितीचे क्षेत्रही महत्त्वाचे आहे. मोठमोठय़ा ब्रॅण्डच्या जीन्स या शहरात अगदी हुबेहूब आणि तुलनेने अगदी स्वस्त दरात तयार होतात. या कापड उद्योगाने या भागातील नैसर्गिक साधनांचा मात्र पुर्ण ऱ्हास केला आहे. जो भरून निघण्यासाठी अनेक दशके खर्ची घालावी लागतील. या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेला जीन्स धुलाई उद्योग संपूर्ण चौथ्या मुंबईच्या पर्यावरणाचा गळा घोटू पाहात आहे. उल्हासनगर शहरात वालधुनी नदीकिनारी सुमारे साडेपाचशे जीन्स कारखाने कार्यरत होते. चार ते पाच दशकांपूर्वी या जीन्स कारखान्यांना सुरुवात झाली. त्या वेळी शहरासाठी एक रोजगाराचे, उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे पाहिले गेले. मात्र उत्तरोत्तर या उद्योगांची संख्या वाढली. जीन्स धुलाई करताना कोणत्याही प्रदूषणांच्या नियमांचे पालन केले गेले नाही. ही धुलाई करताना निघणाऱ्या सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता वालधुनी नदीच्या पात्रात हे पाणी सोडले जात होते. त्यामुळे वालधुनी नदीचा पार नाला झाला आहे. गेल्या काही दशकांपर्यंत याकडे कुणाचेही लक्ष गेले नव्हते. मात्र, गुजरात आणि महाराष्ट्रातील काही औद्योगिक वसाहतींतील कंपन्यांतून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी येथे सोडले गेल्याने वालधुनी नदी प्रदूषणाचा मुद्दा प्रकाशझोतात आला. वनशक्ती संस्थेने या प्रकरणी हरित लवादाकडे धाव घेतली आणि या समस्येचे गांभीर्य सर्वाच्या लक्षात आले.

रसायनांच्या साहाय्याने जीन्स पँट धुतल्या जातात. त्यातून त्या कपडय़ाला मुलायम आणि आकर्षक केले जाते. त्याचा प्रति पँट खर्च ४० ते ५० रुपये असतो. मात्र उल्हासनगर शहरातील प्रदूषणकारी जीन्स कारखान्यांत या पँट अवघ्या पाच ते दहा रुपयांत धुतल्या जातात. त्यामुळे उल्हासनगर शहराकडे अनेक व्यापाऱ्यांचा ओढा वाढला. परिणामी येथे जीन्स उद्योग वाढत गेला आहे. २० बाय २० फुटांच्या जागेत चोवीस तास पाणी देणारी कूपनलिका, तीन फेजची वीज जोडणी आणि उत्तर भारतातून आलेले अवघ्या २०० ते ४०० रुपये प्रतिदिन रोजंदारीवर काम करणारे कामगार असे स्वस्त भांडवल उपलब्ध असल्याने त्यातून प्रतिदिन हजारो जीन्स पँट धुतल्या जात. गेल्या काही महिन्यांपासून या उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. अनेक कामगार आपल्या गावी परतले आहेत. असे असले तरी अनेकांनी आपले बेकायदे उद्योग सुरूच ठेवले आहेत.  अवघ्या दहा दिवसांत उल्हासनगर महापालिकेने सहा अशा कारखान्यांवर कारवाई करत लाखोंचा माल जप्त केला आहे. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही दुर्लक्ष करत असल्याची बाब समोर येत आहे. महापालिकेच्या कारवाईमुळे यापैकी काही उद्योग आता  अंबरनाथ येथील औद्य्ोगिक वसाहत आणि बदलापूरकडे वळले आहेत. काही दिवसांपूर्वी अंबरनाथच्या औद्य्ोगिक वसाहतीत हे जीन्स युनिट सुरू झाल्याची माहिती होती. मात्र स्थानिक उत्पादकांच्या संघटनेने कारवाई करत ते बंद पाडले. त्यामुळे आता या जीन्स कारखानदारांनी आपला मोर्चा बदलापूरकडे वळवला आहे. उल्हास नदीकिनारी असलेल्या शेतघरांमध्ये जीन्स कारखानदार वळले आहेत. याबाबत औद्योगिक महामंडळ प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच स्थानिक नगरपालिकांची भूमिका संशयास्पद आहे. उल्हास, वालधुनी नदी प्रदूषित होत असताना येथील लोकप्रतिनिधींनीदेखील बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. या उद्योगांच्या संपूर्ण मुसक्या कधी आवळण्यात येणार हा प्रश्न प्रलंबित आहे.