बदलापूरः कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या स्विकृत नगरसेवक निवडीत अन्याय झाल्याचा आरोप करत शिंदेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करणाऱ्या उपशहरप्रमुख प्रविण राऊत यांनी गेल्या महिन्यात भाजपात प्रवेश केला होता. आता त्यांना भाजपच्या वतीने स्विकृत नगरसेवकपद देण्यात आले आहे. बुधवारी याची प्रक्रिया पार पडली. या निर्णयामुळे शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देण्यात पुन्हा एकदा भाजप यशस्वी ठरली असून त्यामुळे भाजपची स्थानिक पातळीवरील ताकदही वाढली आहे.

कुळगाव बदलापूर नगर परिषदेची दहा वर्षांनंतर झालेली निवडणूक अनेक अर्थांनी धक्कादायक निकाल देणारी ठरली. भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोबतीने शिंदेंच्या शिवसेनेला नगराध्यक्ष पदाच्या निवडीत पराभूत केले. रूचिता घोरपडे यांच्या रूपाने भाजपने आपला नगराध्यक्ष विराजमान केला.

नगरसेवकांच्या गटाच्या संख्याबळावर शिवसेनेला दोन तर भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला तीन सदस्यपद मिळाले. त्यात भाजपच्या वाट्याला दोन, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला एक स्विकृत सदस्यपद आले. भाजपने शागोफ गोरे आणि तुषार आपटे यांना स्विकृत सदस्यपदी संधी दिली होती. मात्र आपटे हे एका वादग्रस्त प्रकरणातील सह आरोपी असल्याने भाजपवर टीकेची झोड उठवली गेली होती. त्यानंतर नगरसेवक निवडीच्या दुसऱ्याच दिवशी आपटे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे भाजपच्या वाट्याची स्विकृत सदस्याची जागा रिक्त होती.

त्याचवेळी शिंदेंच्या शिवसेनेत स्विकृत सदस्य निवडीवरून नाराजीनाट्य रंगले होते. उपशहरप्रमुख प्रविण राऊत यांनी थेट स्विकृत सदस्य निवडीवरील पक्षातील गटनेते आणि शहरप्रमुखांना लक्ष्य केले होते. भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी वेळीच खेळी करत राऊत यांच्यासाठी भाजपची दारे उघडली. त्यानंतर राऊत यांनी गेल्या महिन्यात भाजपात प्रवेश केला.

बुधवारी स्विकृत सदस्याच्या रिक्त जागेवर निवड प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात भाजपच्या वतीने नव्याने पक्षात दाखल झालेल्या प्रविण राऊत यांना संधी देण्यात आली. नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी प्रविण राऊत यांच्या नावाची घोषणा करत त्यांचे अभिनंदन केले. या खेळीमुळे भाजपची शहरातील ताकद वाढल्याचे बोलले जाते. राऊत बहुजन समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. राऊत यांनी भाजप नेत्यांसह आमदार किसन कथोरे यांचे आभार मानले.

शिवसेनेची दुहेरी कोंडी

प्रविण राऊत यांच्या भाजप प्रवेश आणि स्विकृत सदस्य निवडीने शिवसेनेची दुहेरी कोंडी झाली आहे. राऊतांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेती दुफळी चव्हाट्यावर आली आहे. तसेच प्रविण राऊत यांच्या पत्नी शीतल राऊत आणि वहिनी विजया राऊत या शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. तसेच राऊत यांच्या पाठिंब्यावर आणखी एक नगरसेवक बदलापूर पूर्वेत निवडून आले आहेत. त्या नगरसेविकेचे पती राऊत यांच्यासह भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे पालिकेत कारभारावेळी निर्णायक प्रसंगी या तीन नगरसेवकांचे बळ कुणाच्या पारड्यात पडते याकडे लक्ष्य असेल. तसेच हे समीकरण जुळल्यास भाजपचेही राष्ट्रवादी कॉंग्रेसवरचे अवलंबित्वही कमी होणार आहे. तर शिवसेनेच्या विरोधाची धार बोथट होऊ शकते, असे बोलले जाते.