ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघरमध्ये १६ यंत्रे उपलब्ध होणार

ठाणे: राज्यातील मूत्र्रंपड विकाराच्या रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या डायलिसिस सुविधेसाठी राज्यात ३५ नवीन डायलिसिस केंद्रे सुरू करण्याचा राज्याच्या आरोग्य विभागातर्फे निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयांतर्गत कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर या चार जिल्ह्यांमधील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ७ नवीन डायलिसिस केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी २, रायगड जिल्ह्यात ८, तर रत्नागिरी जिल्ह्यात ४ असे एकूण १६ डायलिसिस यंत्रे बसविण्यात येणार आहेत.

मूत्रपिंड विकाराच्या उपचारासाठी डायलिसिस हा महत्त्वाचा घटक असून ही सुविधा नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी उपलब्ध झाल्यास त्याचा गरजू रुग्णांना फायदा होणार आहे. आरोग्य विभागाने या संदर्भात ३५ नवीन डायलसिस केंद्रे आणि त्यासाठी १०९ डायलसिस मशिन खरेदी करण्याकरिता ९९१ लाख रुपये मंजूर केले आहेत. सद्य परिस्थितीत ठाणे जिल्ह्यात कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली येथे डायलिसिस केंद्रे आहेत. मात्र त्यातील मोजक्याच केंद्रांवर नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेत उपचार घेता येत आहेत. त्यामुळे ज्या केंद्रांवर नागरिकांना सवलतीच्या दरात डायलिसिस सुविधा उपलब्ध होत आहेत तेथे गर्दी होत असल्याने रुग्णांना ताटकळावे लागते. प्रामुख्याने मुरबाड, कसारा या ग्रामीण भागातील नागरिकांना या शहरातील डायलिसिस केंद्रांवर येऊन उपचार घ्यावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत होती. आरोग्य विभागाच्या नवीन डायलिसिस केंद्रे सुरू करण्याच्या निर्णयामुळे शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातील डायलिसिसच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

डायलिसिस केंद्रे

’ ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एक डायलिसिस केंद्र नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी २ डायलिसिस यंत्रे

आणि ५०० लिटर क्षमतेचा

एक आरओ प्रकल्प बसविण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या १४ अन्य उपकरण खरेदीसाठीदेखील मान्यता देण्यात आली आहे.

’ रायगड जिल्ह्यात नवीन केंद्रांची संख्या सर्वाधिक असून उपजिल्हा रुग्णालय पेण, रोहा, श्रीवर्धन आणि कर्जत येथे प्रत्येकी एक

केंद्र आणि त्या ठिकाणी

प्रत्येकी दोन डायलिसिस यंत्रे आणि आरओ प्रकल्प बसविण्यात येणार आहे.

’ रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात एक केंद्र सुरू करण्यात येणार असून तेथे चार डायलिसिस यंत्रे बसविण्यात येणार आहेत.

’ पालघर जिल्ह्यातील जव्हार उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसचे एक नवीन केंद्र सुरू करण्यात येणार असून तेथे दोन डायलिसिस यंत्रे बसविण्यात येणार आहेत.