ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील कळवा-मुंब्रा स्थानका दरम्यान १२ वीचा परीक्षार्थी सोहम कठरे (१८) याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यानंतर ठाणे आणि त्यापल्ल्याडील प्रवाशांच्या जीवघेण्या रेल्वे प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुमारे सात महिन्यापूर्वी मुंब्रा स्थानकाजवळ देखील एका रेल्वे अपघातात पाच जणांचा रेल्वेतून तोल जाऊन मृत्यू झाला होता. या अपघातानंतर राज्य सरकाने रेल्वेतील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने कार्यालयीन वेळेत बदल करण्यासाठी कृती समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. या घटनेला सात महिने उलटल्यानंतरही कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. रेल्वे प्रशासनाने देखील काही आस्थापनांना वेळेत बदल करण्याची विनंती केली होती. परंतु ९ ते १० आस्थापना वगळता त्यांनाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आणखी किती जणांचा रेल्वे गर्दीमुळे बळी जाणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली आणि कल्याण ही शहरे अत्यंत विचित्र पद्धतीने वाढू लागली आहेत. बेकायदा बांधकामे, मुंबईच्या तुलनेत कमी किमतीत मिळणारी घरे यामुळे दिवसेंदिवस येथे वास्तव्यास येणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तुलनेत सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. डोंबिवली, कल्याण भागातील नागरिकांना ठाणे किंवा मुंबई गाठण्यासाठी नवी मुंबई प्रमाणे रेल्वे स्थानकास समांतर असणारे रस्ते देखील नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव येथील नागरिकांना उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

दररोज सकाळी मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यासाठी आणि रात्री घरी परतताना रेल्वेगाडीत उभे राहण्यासही जागा मिळत नसल्याने प्रवासी अक्षरश: रेल्वेच्या दारामध्ये लटकून प्रवास करत असल्याचे दिसतात. जून २०२५ मध्ये मुंब्रा स्थानकाजवळील वळणावर असाच एक अपघात झाला होता. या घटनेत पाच प्रवाशांचा रेल्वेगाडीतून पडून मृत्यू झाला होता. तर आठ प्रवासी जखमी झाले होते. या प्रकरणानंतर राज्य आणि केंद्र सरकारवर टीका झाल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खासगी आस्थापनांच्या कृती समिती गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या गटाचे पुढे काय झाले असा प्रश्र प्रवाशांकडून विचारला जात आहे.

मुंब्रा येथील दुर्घटनेला वर्ष पूर्ण होत नसताना १२ वीच्या परीक्षार्थी सोहम याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने आता पुन्हा एकदा रेल्वेतील असुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुढे आला आहे. गर्दीचे नियंत्रण होत नसल्याने रात्री आणि सकाळी प्रवास करताना प्रवाशांच्या छातीत धडकी भरते. परंतु नोकरीमुळे हा जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

ठाणे पल्ल्याडील प्रवाशांच्या मरण यातना कायम आहेत. समृद्धी महामार्ग, अटल सेतू बनू शकतो. परंतु रेल्वे स्थानकांना समांतर रस्ते निर्माण होत नाही. विकास फक्त ठरावीक लोकप्रतिनिधींचा सुरू आहे. रेल्वेच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार ढिम्म आहे, परंतु विरोधी पक्ष देखील मूग गिळून गप्प आहे. सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे जायचे हा प्रश्न आहे. – लता अरगडे, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना.

याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याला विचारले असता, आम्ही मुंब्रा अपघातापूर्वी देखील खासगी अस्थापनांना कार्यालयीन वेळेत बदल करण्याची विनंती केली होती. परंतु ९ ते १० आस्थापनांनी बदल केल्याचे त्यांनी सांगितले.

डोंबिवली रेल्वे स्थानकात डोंबिवली शहर, एमआयडीसी, शिळफाटा भागात नागरिकरण वाढले आहे. समजा, डोंबिवलीतील एखाद्या नोकरदाराचे कार्यालय ठाण्यात असेल आणि त्याला सकाळी ९ वाजता कार्यालयीन वेळ आहे. तर त्याला ७ वाजता डोंबिवली स्थानक गाठावे लागते. डोंबिवली ते ठाणे हे अंतर रेल्वेने अवघे १० ते १५ मिनीटांचे आहे. परंतु प्रवाशाला सुमारे अर्धा ते पाऊण तास रेल्वेगाडीत प्रवेश मिळविण्यासाठीच जातो. गर्दीमुळे दोन ते तीन गाड्या सोडाव्याच लागतात. त्यानंतर रेल्वेगाड्या देखील वेळेत पोहचत नाहीत. प्रवाशाचे दररोजचे वेळापत्रकच बिघडलेले असते.