ठाणे : घोडबंदर मार्गावर गुरुवारी वाहतुक कोंडीला २४ तास उलटले नसतानाच शुक्रवारी, आज पुन्हा एकदा भीषण वाहतुक कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. घोडबंदर येथील गायमुख घाट ते कासारवडवली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मध्यरात्री ट्रक आणि अवजड वाहन बंद पडल्याने ही वाहतुक कोंडी झाली असून सकाळी ९ नंतरही येथील वाहतुक कोंडी सुटली नव्हती.
घोडबंदर मार्गावरुन हजारो अवजड वाहने उरण जेएनपीए येथून गुजरात, वसईच्या दिशेने वाहतुक करतात. तसेच गुजरात येथून भिवंडी, उरण जेएनपीए आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्यांचे प्रमाणही घोडबंदर मार्गावर अधिक असते. मिरा भाईंदर, वसई, ठाणे, बोरीवली भागातील नोकरदार, प्रवाशांसाठी देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गावरील घोडबंदर गायमुख घाट परिसराची मोठ्याप्रमाणात दुरावस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना प्रचंड वाहतुक कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागतो.
घोडबंदर येथील कापूरबावडी ते गायमुख या पट्ट्यातही मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. येथील रहिवासी ठाण्यात किंवा इतर ठिकाणी प्रवास करायचा असल्यास घोडबंदर मार्गावरुनच वाहतुक करत प्रवास करतात. या भागात मेट्रोची आणि सेवा रस्ता मुख्य रस्त्यात जोडणीची कामे एकाचवेळी सुरु आहेत. त्यामुळे खोदकामे झाली असून रस्ते देखील अरुंद झाले आहेत. त्यातच गुरुवारचा दिवस घोडबंदर भागातील रहिवाशांसाठी कोंडीचा ठरला होती.
गुरुवारी सकाळी मिरा भाईंदर येथील ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने एक अवजड वाहन वाहतुक करत होते. हे वाहन मिरा भाईंदर येथील काजुपाडा भागात सकाळी ७ वाजताच्या सुमारास आले असता, अचानक ते येथील एका दुभाजकाला धडकले. त्यामुळे या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली. काजुपाडा, घाटातील वर्सोवा पूल भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ९.३० नंतरही वाहतुक कोंडी सुटली नव्हती. ही कोंडी सुटत असतानाच आनंदनगर भागात दुपारी किरकोळ अपघात घडला. त्यामुळे दुपारी दोन्ही मार्गावर आनंद नगर ते कासारवडवली आणि ब्रम्हांड पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आजचा दिवसही कोंडीचा
शुक्रवारी मध्यरात्री येथील गायमुख घाटाच्या चढणीवर एक ट्रक आणि घाट परिसरात एक अवजड वाहन बंद पडले होते. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला. मध्यरात्री वाहतुक कोंडी झाल्याने गुजरात, वसईच्या दिशेने वाहतुक करणारी इतर अवजड वाहनेही कोंडीत अडकून होती. सकाळी ठाण्याहून अनेक बसगाड्या घोडबंदर मार्गे बोरिवली, वसईच्या दिशेने वाहतुक करतात. या वाहन चालकांनाही कोंडीचा फटका सहन करावा लागला. गायमुख घाट ते कासारवडवली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी ९ नंतरही वाहतुक कोंडी सुटली नव्हती.
