कल्याण पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावरील चिंचपाडा प्रवेशव्दाराजवळ गटाराचे सांडपाणी तुंबते. मागील महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. पालिका अधिकारी या रस्त्यावरून येजा करतात. या सांडपाण्याचा विषय अधिकाऱ्यांकडून मार्गी लावण्यात येत नसल्याने या भागातील रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
चिंचपाडा प्रवेशव्दार भागात राहणारे रहिवासी, व्यापाऱ्यांनी पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. याऊलट हा विषय बांधकाम विभागाचा आहे, असे उत्तर कर्मचाऱ्यांकडून दिले जाते. बांधकाम विभागाशी संपर्क साधल्यावर हा विषय मलनिस्सारण विभागाशी संबंधित आहे, अशी उत्तरे दिली जातात. एकही अधिकारी या रस्त्याची जबाबदारी घेण्यास तयार नाही. त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हा सांडपाण्याचा विषय मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, खडेगोळवली भाग सर्वाधिक नागरीकरण झालेला आहे. कल्याण पूर्व रेल्वे स्थानक भागात, कल्याण शिळफाटा रस्त्याकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची सतत येजा सुरू असते. रस्त्याच्या मध्यभागी सांडपाण्याचे तळे साचत असल्याने चालकांना रस्त्याच्याकडेने वाहने चालवावी लागतात. या भागातून पादचारी चालत असतात. अनेक वेळा पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडून वाहन चालक, पादचाऱी यांच्यामध्ये वाद होत आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
महिनाभर एकाच ठिकाणी सांडपाणी तुंबल्याने रात्री, सकाळी या भागात दुर्गंधी पसरते. या भागातील रस्त्याच्या दुतर्फा गटार नसल्याने सोसायट्यांमधून बाहेर पडणारे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहून येते, अशी माहिती या भागातील रहिवाशांनी दिली. आय प्रभागातील बांधकाम विभाग डोंबिवली अंतर्गत येतो. तेथे तक्रारी करण्यास जाणे रहिवाशांना शक्य होत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिंचपाडा प्रवेशद्वाराजवळील रस्त्याच्या दुतर्फा गटार नाही. या रस्त्याचे काम प्रस्तावित आहे. गटार नसल्याने बाजुच्या सोसायटीतील सांडपाणी गटारातून रस्त्यावर येते. याठिकाणी पर्यायी नाली काढून पाणी वळविण्यात येते. गटार तुंबले की पाणी रस्त्यावर येते. बाजुचा नाला तुंबला आहे. गटारांची कामे करावीत म्हणून बांधकाम विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. -संजय साबळे ,साहाय्यक आयुक्त ,आय प्रभाग

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sewage chinchpada road east kalyan pedestrians motorists stinking thane amy
First published on: 18-05-2022 at 16:04 IST