डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे मैदान भागातील बावनचाळमध्ये डोंबिवली वाहतूक शाखेच्या उपविभागीय कार्यालयासमोरील सीमेंट काँक्रीट रस्त्यावरील भुयारी गटारातील मलनिस्सारणाचे पाणी सोमवार संध्याकाळापासून रस्त्यावरून वाहत आहे. मलनिस्सारणाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे.
बावनचाळ मैदानाच्या बाजुला एका बार दुकानाच्या समोरच भुयारी गटारातील मल पाणी रस्त्यावरून वाहून येत आहे. सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता आहे. वाहनांमुळे हे मलाचे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. भुयारी गटाराचे झाकण असलेल्या भागात उतार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या उतारावरून पाणी रेल्वे मैदान आणि परिसरात वाहत आहे.
यापूर्वी या भागात एका जलवाहिनीचे काम दोन महिने रखडले होते. त्यानंतर आता मलनिस्सारणाचे भुयारी गटार तुंबून तेथून मलपाणी रस्त्यावर येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. या भागातील रहिवाशांनी या संदर्भात पालिकेच्या ह प्रभागात तक्रारी केल्या आहेत. कामगार येऊन जातात, पण प्रत्यक्ष कृती होत नसल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
भुयारी गटाराच्या समोरील गृहसंकुलातील काही इमारतींच्या मलनिस्सारणाच्या वाहिन्या या भुयारी गटाराला जोडण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांमध्ये काही तरी अडकले असावे किंवा तेथे गाळ, कचरा साचलेला असावा. त्यामुळे या भुयारी गटारातून पाणी बाहेर येत असावे, अशी शक्यता या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली.
डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील अनेक रहिवासी सकाळ, संध्याकाळ गणेशनगर, कुंभारखाणपाडा भागात खाडी किनारी भागात फिरण्यासाठी जातात. त्यांना या मल पाण्याला ओलांडून मग इच्छित स्थळी जावे लागते. मंगळवारी सकाळी ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी हे काम सुस्थितीत करण्यासाठी संबंधित कामगार पाठविले होते. त्यानंतरही या भुयारी गटारातून मल पाणी बाहेर येत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या. .
बावनचाळ रेल्वे मैदान भागात रस्त्यावरील भुयारी गटारातून बाहेर पडणारे मल पाणी बंद करून ते सुस्थितीत करण्यासाठी कामगार पाठविले आहेत. हे काम लवकर सुस्थितीत केले जाईल.-m राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली