ठाणे : महापालिका क्षेत्रातील नाले आणि गटारांच्या साफसफाईची कामे सुरू आहेत. ही कामे करणाऱ्या ठेकेदारांना १५ मेपर्यंत ५० टक्के तर ३१ मेपर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कामांची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी करत आढावा घेण्यास सुरुवात केला असून त्यात काही ठिकाणी नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे.
ठरल्याप्रमाणे १५ मेपर्यंत ५० टक्के नालेसफाई होणार नाही, त्या ठेकेदारांना पालिकेकडून कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यास त्याच्यावर दंडात्मक तसेच ठेका रद्द होणार आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.
महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत. शहरात दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. यंदा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ातच नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी व पोकलेन या मशीनचा वापर करून नाल्यातील गाळ काढण्याचे काम व्यापक प्रमाणात सुरू आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मुख्य तसेच लहान-मोठे असे एकूण ३०० किमी लांबीचे नाले आहेत.
नालेसफाईचे काम हे कमी वेळेत व्हावे यासाठी नऊ प्रभाग समिती स्तरावर कामाचे विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार या कामाच्या निविदा काढून ठेकेदार निश्चित करण्यात आले आहेत. ही कामे करणाऱ्या ठेकेदारांना १५ मेपर्यंत ५० टक्के तर ३१ मेपर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील सर्वच नालेसफाईच्या कामांची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहाणी करत आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्यादरम्यान शहरात ४० ते ५० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करत उर्वरित नालेसफाईची कामे प्राधान्याने वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी घनकचरा विभागास दिले. तसेच शहराच्या काही भागांत चांगल्या प्रकारे तर काही भागांत संथगतीने नालेसफाईची कामे सुरू असल्याची बाबही दौऱ्यादरम्यान त्यांच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर १५ मेपर्यंत ५० टक्के नालेसफाईची कामे पूर्ण करणार नाहीत, त्या ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानुसार या विभागाने प्रत्येक नाल्याच्या सफाई कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून त्यात ५० टक्के काम पूर्ण झालेले नसल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात ७२ तासांत ठेकेदारांना स्पष्टीकरण देण्याची मुदत दिली जाणार आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.
सर्वच ठेकेदारांना १५ मेपर्यंत ५० टक्के तर ३१ मेपर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे काम झालेले नसल्याचे आढळून आल्यास त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्यावर त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच या नोटिसांना उत्तर दिले नाहीतर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. – मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका
