ठाणे : ठाणे महापालिकेतील माजी महापौर आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांचा धक्कादायकरित्या पराभव करणारे जायंट किलर ठरलेले शहाजी खुस्पे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे जाऊन भेट घेतली. ठाणे महापालिका निवडणुकीत एकमेव उमेदवार मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. अशोक वैती हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ राहतात. ज्या प्रभागात शिंदे यांचे निवासस्थान आहे. त्याच प्रभागात अशोक वैतींचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिवसेनेकडून अशोक वैती हे मागील अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक १३ मधून निवडून येत होते. हा भाग ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगर, काजूवाडी, हाजूरी असा आहे. अशोक वैती हे माजी महापौर देखील होते. तर ठाकरे गटाकडून नवखे उमेदवार शहाजी खुस्पे हे निवडणूक लढवित होते. परंतु अशोक वैती यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे.
खुस्पे यांना १२ हजार ८६० मते मिळाली. तर अशोक वैती यांना १२ हजार १९३ मते मिळाली. काजुवाडी भागात अशोक वैती हे राहतात. याच प्रभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील निवासस्थान आहे. खुस्पे यांनी प्रचारामध्ये देखील वैती यांच्यापेक्षा आघाडी घेतली होती. त्यामुळे हा विजय झाल्याचे बोलले जाते. ठाण्यात ठाकरे यांचे एकमेव उमेदवार आहेत. वैती यांच्या पराभवामुळे शिंदेंना मोठा धक्का बसला आहे.
रविवारी खुस्पे यांचे अभिनंदन उद्धव ठाकरे यांनी केले. खुस्पे यांना ‘मातोश्री’वर बोलविण्यात आले होते. त्यानुसार, रविवारी ते शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासोबत मातोश्रीवर गेले होते.
