कल्याण – बहुजन समाज पक्षाचे शहापूर तालुक्याचे विधानसभा माजी अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील निर्भिड कार्यकर्ते लक्ष्मण जैतू उबाळे यांचे गुरूवारी मुंबई शीव येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षाचे होते. ते शहापूर तालुक्यातील शेणवे गावचे रहिवासी होते.

लक्ष्मण उबाळे हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील एक निर्भिड कार्यकर्ता म्हणून ओळखले जात होते. बहुजन समाज पक्षाचे शहापूर तालुका विधानसभा प्रभारी म्हणून त्यांनी काम केले. अध्यक्ष पदावर असताना त्यांनी पक्षहित आणि सामाजिक कार्यासाठी धडाडीने कामे केली. कष्टकरी घरातून लक्ष्मण उबाळे यांची वाटचाल सुरू झाली होती. शेती, शेळीपालन हा त्यांचा पूर्वपरंपार व्यवसाय होता.

शेणवे गावातील अनेक विकासाची कामे मार्गी लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला. कायदेविषयक अभ्यासाची त्यांना जाण होती. माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून ते सक्रिय होते. गाव परिसरातील नागरिकांना विविध प्रकारचे मार्गदर्शन ते करत असत. लक्ष्मण उबाळे यांच्या निधनाबद्दल संघकारा परिवाराचे राजेश निकम यांनी शोक व्यक्त केला. बहुजन समाज पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. शहापूर तालु्क्यातील शेणवे येथील गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.