शहापूर : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरातील आजोबा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खांडीचापाडा (डेहणे) येथे दरड कोसळून घरांचे नुकसान झाले. तानसा नदीला आलेल्या पुरामुळे वाडा–शहापूर तालुक्यांना जोडणारा सावरोली पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही तालुक्यांतील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. तर काळू नदीच्या पुराचे पाणी अल्याणी गावातील घरांमध्ये पाणी शिरले असून विजेचे खांब लोंबकळले, वीजतारा तुटल्याने अल्याणी गावाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे जनजीवन अक्षरशः ठप्प झाले.
शहापूर तालुक्यात मंगळवारीही पावसाचा जोर कायम होता. डोळखांब परिसरातील आजोबा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खांडीचापाडा येथे डोंगराचा भाग कोसळून काही घरांचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने या दरड दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर तानसा नदीला आलेल्या पुरामुळे वाडा–शहापूर तालुक्यांना जोडणारा सावरोली पूल मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पाण्याखाली गेल्याने दोन्ही तालुक्यांतील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. अल्याणी गावालगतच्या काळू नदीलाही मोठा पूर आल्याने नदीचे पाणी गावात तसेच काही घरांमध्ये शिरले असून तेथील शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे लागवडीखालील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून विजेचे पोल झुकले, विजवाहक तारा तुटल्याने बत्ती गुल झाली असून अल्याणी परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले.
संततधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून नदीकाठच्या व डोंगरपायथ्याच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
