शहापूर : वाशाळा भागातील पिंगळवाडी व ढाकणे क्षेत्रातील एका नदी पात्रालगत बिबट्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात त्याला निर्घृणपणे मारण्यात आल्याचे स्पष्ट झाले. हा बिबट्या दोन वर्षे वयाचा नर जातीचा असून त्याच्या दोन्ही पायांचे पंजे तोडण्यात आले होते. तसेच एका पायाची नखे देखील गायब होती. या प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी दोघांना अटक केली असून याप्रकरणात कोणते रॅकेट आहे का, याचा तपास वन विभागाकडून सुरु आहे. तसेच, प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य तस्करखोरांचा शोध सुरू आहे.

विविध डेरेदार वृक्षांसह घनदाट वनसंपदेची व्याप्ती असलेल्या वाशाळा परिसरातील पिंगळवाडी व ढाकणे क्षेत्रातील एका नदी पत्रात मंगळवारी बिबट्याचा मृतदेह असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर वाशाळा वनपरिक्षेत्र अधिकारी एकनाथ रोंगटे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नर जातीच्या मृत बिबट्याचे दोन्ही पायांचे पंजे तोडण्यात आले होते आणि एका पायाची नखे देखील गायब असल्याचे निदर्शनास आले. संशयास्पद अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने याघटनेची गंभीर दखल घेत वनाधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला. स्थानिक माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे. वन्यजीव व त्याचे विविध अवयवांच्या तस्करीच्या हेतूने बिबट्याची शिकार करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, खर्डी, अघई सह चार पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले असून अवयवांचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्यानंतर बिबट्याचे दफन करण्यात आले. याप्रकरणातील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.