ठाणे – ‘आयपीएल २०२६’ च्या मिनी लिलावात उदयोन्मुख (अनकॅप्ड) अर्थात भारतासाठी अद्याप खेळत नसलेल्या खेळाडूंना चांगलाच ‘भाव’ मिळाल्याचे चित्र आहे. चेन्नई सुपर किंग्स ही उदयोन्मुख खेळाडूंना संघात स्थान देण्यात अग्रेसर ठरली आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बहुल शहापूर तालुक्यातील भुमिपुत्राने देखील क्रिकेटच्या राष्ट्रीय व्यासपीठावर आपला ठसा उमटवला आहे. हा तरूण थेट आयपीएल २०२६ मध्ये खेळताना दिसणार आहे.

शहापुर तालुक्यातील शेरे गावातील हा तरूण आहे. ओंकार तुकाराम तारमळे हे त्याचे पुर्ण नाव. ओंकारची आई ही गृहिणी तर वडील ट्रॅक्टर चालक आहेत. ओंकारने चौथीपर्यंत जिल्हापरिषद शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर बारावीपर्यंत वासिंदच्या सरस्वती विद्यालयात त्याचे शिक्षण झाले. त्याला लहानपणापासूनच क्रिकेट व कबड्डीची आवड होती. अगदी सामान्य कुटुंबातील असल्याने त्याने कोणत्याही अकादमी मध्ये न जाता शेरे गावाजवळ असणाऱ्या गेरसे गावातील मोकळ्या मैदानावर क्रिकेटचा खेळण्यास सुरूवात केली.

रेल्वे संघाकडून खेळणारे नरेंद्र दिवाने यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवून ओंकारने स्थानिक स्पर्धांसह जिल्हा आणि विभागीय स्तरावर तसेच एमपीएल मध्येही दमदार कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधले. त्यानंतर आयपीएलसाठी आवश्यक ते सोपस्कार पार पाडत मुंबई, दिल्ली, हैदराबाद येथील सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीची उत्कृष्ट झलक दाखवली. आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने ओंकार यांची निवड केली आहे. मराठमोळा ओंकार तारमळेची आयपीएलसाठी ३० लाख रुपये देऊन निवड केली आहे.

गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

विविध अडचणींवर मात करत मिळालेल्या यशाने संपूर्ण तालुका भारावून गेला आहे. शेरे ग्रामस्थांसह मित्रमंडळी, नातेवाईक, राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांनी ओंकारच्या भेटीसाठी गर्दी केली. तर, शेरे गावात ओंकारची मिरवणूकही काढण्यात आली.

कोण आहे ओंकार तारमळे ? ओंकार तुकाराम तारमळे असे या खेळाडूचं पूर्ण नाव असून २२ ऑगस्ट २००२ रोजी जन्म झाला आहे. सध्या तो २३ वर्षांचा असून वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. टेनिस बॉल क्रिकेटपासून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे परिसरातील स्थानिक तसेच देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.