कल्याण : महावितरणच्या कल्याण मंडळ-२ च्या वतीने मागील दोन दिवस शहापूर व मुरबाड तालुक्यांतील विविध गाव परिसरात राबवलेल्या वीज चोरी शोध विशेष मोहिमेत ८२ वीज चोरीची प्रकरण उघडकीस आणण्यात आली. या माध्यमातून वापरलेल्या वीज युनिटप्रमाणे १३ लाख रुपयांचे वीज देयकाचे मूल्यांकन करण्यात आले.
महावितरणच्या कल्याण कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना शहापूर व मुरबाड परिसरात वीज चोरीच्या घटना वाढत असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे घटनांची खात्री करून कारवाईसाठी विशेष पथके तयार करण्यात आली. या मोहिमेत १९ अभियंते, १८ लेखा कर्मचारी व ४५ जनमित्रांनी सहभाग घेतला.
मोहिमेत विविध गावांतील घरटी ८०० पेक्षा अधिक वीज जोडण्यांची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच वीज खांबांवर आकडे टाकून, बांबूचा आधार घेऊन कायमस्वरूपी वीज वापर करणाऱ्या अनधिकृत वीजवापर व वीजचोरीप्रकरणी कठोर कारवाई करण्यात आली. अचानक कारवाईमुळे वीज चोरांना बचाव करता आला नाही. अनेक वीजचोऱ्या महावितरणच्या पथकाने जागीच पकडल्या.
या तपासणीदरम्यान ८२ वीजचोरीची प्रकरणे निदर्शनास आली. त्यात एकूण ७२ हजार ४३८ वीज युनिट वीजचोरी झाल्याचे महावितरण अधिकाऱ्यांना आढळून आले. या वीज चोरीची सुमारे १३ लाख ११ हजार ८०० रूपये इतकी रक्कम जवळपास निश्चित करण्यात आली. वीज चोरी केलेल्या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित ग्राहकांविरुद्ध वीज अधिनियम, २००३ मधील तरतुदीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिवाय, थकीत दंड व वीज देयकाची रक्कम विहित मुदतीत न भरल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही वीजचोरी शोध मोहीम शहापूर, मुरबाड परिसरात सुरूच ठेवण्यात येणार आहे, असे अधिकारी म्हणाला.
घरघंटी वीज चोरी
शहापूर, मुरबाड तालुक्यातील अनेक ग्रामस्थांकडे पीठाची चक्की, घरघंट्या आहेत. ही पीठाची चक्की, घरघंटी चालक दिवसभर गावातील दळणे घेऊन ठेवतात. आणि रात्री आठ वाजल्यानंतर वीज मीटरला तारेचा आकडा लावून वीज चोरी करून पीठाची गिरणी, घरघंटी चालू करतात.
या गिरणी चोरीची वीज वापरून रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत गिरणी चालकांकडून सुरू असतात. त्यामुळे शहापूर व मुरबाड तालुक्यांत ज्या घरांमध्ये पीठ गिरणी, घरघंटी, मसाला तयार करण्याचे यंत्र आहे, त्यांची माहिती घेऊन महावितरणने वीजचोरांवर छापे टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
एक गिरणी मालक वर्षभराला लाखो वीज युनिटची वीज चोरी करत असल्याचे समजते. रात्री आठ वाजल्यानंतर महावितरणच्या भरारी पथकाने या गिरणी, घरघंटी चालकावर छापे टाकल्यास लाखो रूपयांची वीज चोरी रोखता येईल, असे काही ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटले आहे.
