शहापूर : शासकीय कार्यालये डिजिटल, सुरक्षित आणि सुसज्ज ठेवण्याच्या शासनाच्या वारंवार घोषणांनंतरही शहापूर पंचायत समितीतील प्रत्यक्ष स्थिती मात्र वेगळीच असल्याचे चित्र समोर आले आहे. येथील लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयाचा मुख्य दरवाजा गेल्या चार महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत असूनही त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या हलगर्जी कारभारामुळे कार्यालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लघुपाटबंधारे विभागामार्फत ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन, सिंचन योजना, लघुपाटबंधारे प्रकल्पांची देखभाल तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि संवेदनशील नोंदी हाताळल्या जातात. मात्र या कार्यालयाचा मुख्य दरवाजाच तुटलेल्या अवस्थेत असल्याने संपूर्ण कार्यालय रात्रंदिवस उघडे पडत आहे. यामुळे कागदपत्रांची सुरक्षितता, कार्यालयीन साधनसामग्री तसेच संवेदनशील माहितीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
संबंधित विभागाकडून दरवाजाच्या दुरुस्तीसाठी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे वारंवार लेखी पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र चार महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर होणाऱ्या अशा दुर्लक्षामुळे शासकीय यंत्रणेतील समन्वयाचा अभावही स्पष्टपणे दिसून येत आहे.
या प्रकारामुळे केवळ कार्यालयाचीच नव्हे तर संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कार्यालय उघडे असल्याने चोरी, कागदपत्रांचे नुकसान किंवा इतर अनुचित घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळा जवळ येत असल्याने पाणी व हवामानामुळे कागदपत्रांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंचायत समितीच्या आवारातील शासकीय इमारतीची अशी अवस्था असेल, तर ग्रामीण भागातील विकासकामे आणि दुरुस्तीच्या कामांबाबत प्रशासन किती गंभीर आहे, असा उपस्थित केला जात आहे. तसेच एखादी अनुचित घटना घडल्यानंतर जबाबदारी निश्चित कोणाची, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकाराची तातडीने दखल घेऊन दरवाजाची दुरुस्ती करण्यात यावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.
