कल्याण – शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील विद्याप्रसारक मंडळाच्या शहा चंदुलाल सरूपचंद विद्यालयातील शिपाई दत्ता मोंडुला उर्फ मोंडुला काका (५६) मागील ३५ वर्ष आदिवासी दुर्गम भागातील खंडुची वाडी या आपल्या पाड्यावरून सायकलने गावपाडा ते हायस्कूल असा २५ किलोमीटरचा प्रवास दररोज सायकलने करत आहेत. शाळेतील सुट्टीचा दिवस सोडला तर बाराही महिने ते उन, पाऊस, थंडी वातावरणाची पर्वा न करता नेकीने सायकलवरून प्रवासाचा शिरस्ता सोडत नाहीत.
शहापूर तालुक्यातील शेणवे गावापासून मुसई, मुसई आदिवासी वाडी, घरटन, कृष्णाची वाडी ते खंडुची वाडी हा डोंगर दऱ्यातील जंगलमय भाग. मुसईवाडीचा रस्ते मार्गातील चढणीचा प्रवास, त्यानंतर पठारावरील चढ उताराचा मार्ग हा सर्व प्रवास ५६ वर्षाचे दत्ता मोंडुला दररोज सायकलने करतात. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक दत्ता मोंडुला यांना मोंडुला काका या नावाने ओळखतात.
दुचाकीला नकार
दुर्गम भागातील खंडुची वाडी ते किन्हवली हा शाळेपर्यंतचा प्रवास आपण सायकलने करण्यापेक्षा मोटार सायकल घेऊन करावा, अशा सूचना ग्रामस्थ, शाळेतील सहकारी कर्मचारी, मोंडुला यांच्या मित्रांनी मोंडुला यांना केल्या. ते आपला सायकलने प्रवास करण्याचा हेका सोडण्यास तयार नाहीत. सायकल हे माझे दररोजचे व्यायामाचे साधन आहे. या सायकल प्रवासामुळे मी आतापर्यंत विनाव्याधी आणि शरीरप्रकृतीने ठणठणीत आहे, असे मोंडुला काका आपल्या सहकाऱ्यांना सांगतात. खंडुचीवाडी ते किन्हवली हा २५ किलोमीटरचा प्रवास दत्ता मोंडुला एका दमात पूर्ण करतात.
खंडुची वाडी, घरटन, मुसई वाडी, मुसई गाव, शेणवे नाका, मळेगाव, उंभ्रई, मुगाव ते किन्हवली मोंडुला काका यांचा दररोजचा प्रवास असतो. उन, पाऊस आणि थंडीच्या दिवसात त्यांच्या या प्रवासात खंड पडत नाही. महापुराची परिस्थिती असेल तर फक्त मोंडुला काका त्या दिवशी आपल्या प्रवासाला रजा देतात, अन्यथा त्यांना सायकलवरून प्रवासाचा नित्यक्रम सुरू असतो. सायकलवरून प्रवास करूनही ते वेळेत शाळेत पोहचतात. त्यांचा हा मागील ३५ वर्षाचा शिरस्ता कायम आहे, असे विद्याप्रसारक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ वेखंडे यांनी सांगितले.
साधे राहणीमान साधी राहणी, वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्याप्रती अढळ निष्ठा असे मोंडुला काका यांचे आचरण आहे. विद्याप्रसारक मंडळाच्या तिन्ही विद्यालयांमध्ये सेवा बजावताना मोंडूला काकांनी आपल्या प्रामाणिक कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. वक्तशीरपणा, मनमिळाऊ स्वभाव आणि कामाप्रती असलेली निष्ठा यांमुळे ते संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमधील आदर्शवत कर्मचारी आहेत. कोणतेही काम मनापासून आणि प्रामाणिकपणे केले, तर त्या कामाला प्रतिष्ठा प्राप्त होते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.
आजच्या आधुनिक युगात अनेकजण दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर करतात; मात्र मोंडूला काका आजही दररोज सायकलवरून सुमारे २५ किलोमीटर प्रवास करतात. सायकल आणि त्यांची सेवा हे जणू अतूट समीकरण बनले आहे. अनेक वर्षांपासून जपलेली ही सवय त्यांच्या साधेपणाची, शिस्तीची आणि कामाप्रती असलेल्या समर्पणाची साक्ष देते. त्यांच्या जीवनशैलीतून काटकसर, नियमितपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश मिळतो, असे मुख्याध्यापक वेखंडे यांनी सांगितले.
मोंडूला काकांचा मुलगा पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून कार्यरत आहे. वडिलांचे कष्ट, त्याग आणि संस्कार यांचे हे अभिमानास्पद फलित मानले जात आहे. ‘साधी राहणी आणि उच्च विचार’ यांसोबतच ‘कर्तव्यनिष्ठा हीच खरी प्रतिष्ठा’ हा संदेश मोंडूला काकांचे जीवन देते. अशा व्यक्ती समाजासाठी खरे प्रेरणास्रोत ठरतात, असे मुख्याध्यापक वेखंडे यांनी सांगितले
