महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला ३ ते १८ वर्षांपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने राज्यभर व्यापक जनजागृती अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका विद्दुलता पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुक्यातून करण्यात आला. तालुक्यातील सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टपाल पत्रातून शिक्षणाचा हक्क १८ वर्षांपर्यंत कायदेशीर करण्याची मागणी केली. शहापूर तालुक्यातील ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
‘प्रिय देवाभाऊ, महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला १८ वर्षांपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण तुम्हीच देऊ शकता,’ असे भावनिक आवाहन विद्यार्थ्यांनी या टपाल पत्रातून केले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, तसेच नीती आयोगाच्या शिफारशींनुसार १८ वर्षांपर्यंतच्या प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात तातडीने करण्यात यावी, अशी मागणी या पत्रांच्या माध्यमातून आणि अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आताच्या शिक्षण धोरण कायद्यानुसार १४ वर्षांपर्यंत मोफत शिक्षणाची तरतूद आहे. बदलत्या काळाची गरज लक्षात घेता ती १८ वर्षांपर्यंत वाढविणे आवश्यक असल्याचे श्रमजिवी संघटनेने नमूद केले आहे. शहापूर तालुक्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात टपाल पत्र लिहून आपल्या गाव परिसरातील टपाल पेटीत स्वताहून ही पत्रे टाकली आहेत.
मुख्यमंत्री साहेब यांना टपाल पत्र पाठवतो याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आदिवासी दुर्गम भागातील साकडबाव येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बाळाराम भाऊ भोईर, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण चौधरी, कार्यालय सचिव कमलाकर शिंदे, तालुका संघटक कैलास मुकणे, गटाध्यक्ष नकुल विशे आणि गणाध्यक्ष संतोष गिरा उपस्थित होते. या अभियानासाठी तालुक्याच्या मुख्य टपाल कार्यालय, शहापूर येथे तालुकाध्यक्ष मालू हुमणे, तालुका महिला प्रमुख लक्ष्मी वाघ, पिवळी गाव येथे तालुका उपाध्यक्ष रुपेश आहिरे, तालुका सचिव प्रकाश खोडका, गणाध्यक्ष मीरा वाघ, टपाल कार्यालय खर्डी येथे तालुका उपाध्यक्ष पप्पू वाघ, गणाध्यक्ष यमुना गिरा, आटगाव येथे तालुका उपाध्यक्ष कैलास घाटाळ, किन्हवली येथे तालुका उपाध्यक्ष विशाल मुकणे, वासिंद येथे गटाध्यक्ष बाळा हरड, खातिवली येथे गटाध्यक्ष कमलाकर तारमाळे व गणाध्यक्ष हरी वाघे, कसारा येथे मंदा कवटे, वाशाळा येथे नवसू वाघ, शिरोळ येथे भाऊ वाघ व त्या विभागातील कार्यकर्ते, अघई येथे यशवंत टोकरे, अशोक वळंबा व ज्ञानेश्वर दिवा, तानसा येथे संगीता राऊत, गुरुनाथ कुरकुटे व पुंडलिक दिवा यांनी टपाल कार्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत आणि घटनात्मक अधिकार असून, तो १८ वर्षांपर्यंत मोफत व सक्तीचा करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी विद्यार्थ्यांनी या टपाल पत्रातून केली आहे. शहापूर तालुक्यातील या उपक्रमाला पालक, नागरिक आणि श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
