कल्याण – शहापूर तालुक्यातील गाव, पाडे, आदिवासी वाड्यांवरील शेतकऱ्यांचे महसूल, जमीन विषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी आपली कार्यालयीन वेळ संपली की संध्याकाळच्या वेळेत गाव, आदिवासी पाड्यांवर जाऊन गावातील एका मोकळ्या अंगणात घोंगडी, सतरंज्यांवर ग्रामस्थांसोबत बसून ग्रामस्थांचे जमीन विषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी घोंगडी सभा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमामध्ये तहसीलदार कासुळे गावकरी, आदिवासी पाड्यांमध्ये जातात. यावेळी कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा सोबत ठेवला जात नाही. गावातील, आदिवासी पाड्यातील एखाद्या घराच्या अंगणात घोंगड्या, सतरंज्या पसरून त्यावर तहसीलदार आणि ग्रामस्थ एकत्रितपणे बसतात. यावेळी खुर्च्या, टेबल, पुष्पगुच्छ असा कोणताही डामडौल ठेवला जात नाही.
ग्रामस्थांना मोकळेपणाने तहसीलदारांशी बोलता यावे, ग्रामस्थांना बोलताना कोणत्याही प्रकारचा दबाव नको म्हणून इतर सहकर्मचारी या उपक्रमाच्या वेळी सोबत ठेवले जात नाहीत. शेतकऱ्यांचे सात बारा, उतारे, जमीन विक्री, भूसंपादन, जमीन नावावर करून घेणे आणि शासनाच्या शेतकरी हिताच्या आवश्यक योजनांचा लाभ तुम्हाला मिळतो का. ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी तुमची कामे वेळेत करून देतात की नाही. त्यांच्याकडून काही त्रास आपणास देण्यात येतो का, असे प्रश्न तहसीलदार कासुळे यांच्याकडून ग्रामस्थांना केले जातात.
यावेळी ग्रामस्थ आपल्या शेतजमीन विषयक, सातबारा उतारा, फेरफारविषयक अडचणी तहसीलदारांना सांगतात. या अडचणींची नोंद तहसीलदार घेतात. त्या तात्काळ मार्गी लागतील या दृष्टीने प्रयत्नशील राहतात. सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत ठेवले तर ग्रामस्थांना मोकळेपणा आपली भूमिका मांडता येत नाही.
आदिवासी पाड्यांना प्राधान्य
शहापूर तालुक्यातील आदिवासी डोंगर पठारावरील कोठारे, कृष्णाची वाडी, चिल्लारवाडी, साकडबाव पठार परिसरातील आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन तहसीलदार कासुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तहसीलदार थेट आपल्या गावात येऊन आपल्याशी आपल्या जमीन, महसूल प्रश्नाविषयी संपर्क साधत असल्याने ग्रामस्थ समाधानी होत आहेत. तहसीलदार कार्यालयात गेल्यानंतर तेथील गर्दी, नागरिकांच्या भेटी आणि प्रशासकीय व्यस्त कामामुळे अनेक वेळा नागरिकांना तहसीलदारांशी थेट संपर्क किंवा संवाद साधता येत नाही. नागरिकांना आपल्या जमीन महसूलविषयक अडीअडचणी थेट आपणास सांगता याव्यात. आणि शासनाच्या सहज सुलभतेने झटपट प्रशासकीय काम या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी या उद्देशातून तहसीलदार कासुळे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक
शहापूर तालुक्यात अशा प्रकारचा घोंगडी बैठकीचा आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम कधीच कोणत्याही तहसीलदाराने राबविला नव्हता. त्यामुळे या उपक्रमाची शहापूर तालुक्यात चर्चा सुरू आहे. हा उपक्रम आपल्या गावात व्हावा यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील राहत आहेत. कोठारे आदिवासी पाड्यावर सरपंच चंद्रकांत दरोडा यांच्या उपस्थितीत ही बैठक संध्याकाळच्या वेळेत पार पडली. यावेळी कोठारे ग्रामस्थांनी आपल्या जमीन महसूलविषयक अडचणी तहसीलदारांना सांगितल्या. त्या मार्गी लावण्याचे आश्वासन तहसीलदार कासुळे यांनी दिले.
गाव, आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांचे जमीन महसूलविषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यासाठी सुरू केलेला घोंगडी उपक्रम ग्रामस्थांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी खूप महत्वाचा आहे. ग्रामस्थांना आपल्या जमीन महसूलविषयक अडचणी थेट तहसीलदारांना सांगण्याची आणि त्या सोडवून घेण्याची मुभा या उपक्रमात आहे. – चंद्रकांत दरोडा, सरपंच, कोठारे ता. शहापूर.
